सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.
नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवून सीआरपीएफ जवानांना टिपलं होतं... हा स्फोट इतका भीषण होता की अनेक टन वजनी MPV गाड्यांचेही तुकडे तुकडे उडाले. महत्त्वाचं म्हणजे, हा हल्ला अचानक झाला नव्हता.
एका सीआरपीएफ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजता किस्टारामहून पलौदी कॅम्पसाठी सीआपीएफची २१२ व्या बटालियनच्या पाच टीम रवाना झाला होत्या. एक टीम बाईकवर स्वार झाली होती. किस्टारामहून थोड्या अंतरावर गेल्यावर जवानांनी नक्षलवाद्यांना दूरवरूनच हेरलं. यावेळी, जवानांना फसवण्यासाठी नक्षलवादी सेनेच्या ड्रेसमध्ये होते. तरीदेखील सीआरपीएफ जवानांनी त्यांना ओळखलं होतं.
सीआपपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत तत्काळ UBGL च्या साहाय्यानं एकानंतर एक तीन बॉम्ब सोडले. परंतु, निष्कृष्ट दर्जाच्या या बॉम्बचा स्फोट झालाच नाही. हे स्फोट झाले असते तर कमीत कमी १०० नक्षलवादी ठार झाले असते. परंतु, निकामी दर्जाच्या या बॉम्बनं जवानांचा विश्वासघात केला.
या घटनेनंतर सर्व जवान किस्टारम कॅम्पला परतले. त्यानंतर जवान पुन्हा एकदा पलौदीसाठी निघाले. किस्टाराम आणि पलौदी दोन्ही ठिकाणी सीआरपीएफच्या २१२ बटालियनचा कॅम्प आहे.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, पलौदी गावात १०० हून अधिक नक्षलवाद्यांनी तळ ठोकला होता. त्यांच्याकडे जवानांची सर्व माहिती होती. हे जवान लँड माईनमध्ये वाचले असते तर त्यांच्यावर फायरिंग केली गेली असती.
हा हल्ला म्हणजे २ मार्च रोजी मारल्या गेलेल्या १० नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा सूड मानला जातोय. होळीच्या दिवशी २ मार्च रोजी तेलंगाना-छत्तीसगडच्या सीमेवर राज्य पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या एका लग्नादरम्यान हल्ला करून १० नक्षलवाद्यांना ठार केलं होतं. यामध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचाही समावेश होता. सूडाच्या हेतूनं नक्षलवाद्यांनी ७ मार्च रोजी कांकेरमध्ये रावघाट ठाण्याच्या किलेनार भागात घातपात घडवून आणून बीएसएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात बीएसएफचा असिस्टंट कमांडट आणि एक जवान शहीद झाले होते.