वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मागील पाच वर्षांमधील आहे. मोदी यांना आज वाराणसीतून आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. यावेळी त्यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मोदी यांच्याकडे फिक्स डिपॉझिटच्या स्वरुपात जास्त चल संपत्ती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिट आहेत. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. तसेच कोणतेही वाहन नसल्याचे म्हटले आहे.
दिल्ली विद्यापीठातून मोदी यांनी १९७८ मध्ये पदवी घेतली त्यानंतर १९८३ मध्ये अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मोदी यांच्याकडे एकूण संपत्ती २.५१ कोटी रुपये आहे. चल संपत्ती १.४१ कोटी रुपये आणि अचल संपत्ती १.१० कोटी रुपये आहे. २०१४ च्या तुलनेत मोदींच्या चल संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये मोदी यांनी पहिल्यांदा वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. २०१४ साली मोदींकडे ६५.९१ लाख चल संपत्ती होती. सरकारी वेतन आणि बचतीवर मिळणारे व्याज हे नरेंद्र मोदी यांचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे, असे त्यांच्या प्रतिज्ञाप्रत्रात म्हटले आहे. दरम्यान, मोदी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या उत्पन्नाबाबत मात्र, कोणताही तपशील दिलेला नाही.
आपल्या विरोधात कुठलाही गुन्हेगारी आरोप नसल्याचे मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली संपत्ती तीन प्रकारात मोडते. चल, अचल आणि देणी असे वर्गीकरण केले जाते. ३१ मार्च २०१९ रोजी मोदींकडे ३८,७५० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. मोदी यांच्याकडे ४,१४३ रुपये बँक बॅलन्स असून १.२७ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहेत. २०१४ साली मोदींकडे ३२ हजार ७०० रुपये रोकडमध्ये उपलब्ध होते. २६.०५ लाख रुपये बँक बॅलन्स होता आणि फिक्स डिपॉझिटमध्ये ३२.४८ लाख रुपये होते.
२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मोदी यांनी २० हजार रुपये बाँडमध्ये गुंतवले आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ७.६१ लाख रुपये आणि लाईफ इन्शुरन्समध्ये १.९० लाख रुपये आहेत. तर ४५ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठया असून ३१ मार्च २०१९ च्या व्हॅल्युएशननुसार त्याची किंमत १ लाख १३ हजार ८०० रुपये आहे. तर २०१४मध्ये त्या अंगठयांची किंमत १.३५ लाख रुपये होती.