धक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा Heart Attack ने मृत्यू, आईच्या मोबाईलवर कार्टून बघत होती अन्...

Heart Attack while watching cartoon : उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. 

सौरभ तळेकर | Updated: Jan 21, 2024, 07:15 PM IST
धक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा Heart Attack ने मृत्यू, आईच्या मोबाईलवर कार्टून बघत होती अन्... title=
5 year old girl died, heart attack

Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे. 

झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या आई वडिलांसह राहत होती. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महेश खरगवंशी यांची 5 वर्षांची मुलगी कामिनी बिछान्यात बसली असताना तिने आईचा मोबाईल घेतला अन् कार्टून पाहण्यास सुरूवात केली. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो जमिनीवर पडला. मात्र, बाजूला बसलेल्यांना वाटलं की मोबाईल मुद्दामहून पडलाय. मात्र, मुलीला अस्वस्थ अवस्थेत पाहिल्यावर आई-वडिलांची तांरबळ उडाली. मुलीला काहीतरी झाल्याचं पाहून आसपासचे लोक धावत आले. मुलीला तातडीने गावातील डॉक्टरांना दाखवण्यात आले. मात्र, तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

मुलीचं नाव कामिनी असल्याचं समोर आलंय. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांचा पाचवा वाढदिवस 30 जानेवारीला साजरा होणार होता. कामिनीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय. आमची एकुलती एक मुलगी पूर्णपणे निरोगी होती, असं कुटूंबियांनी सांगितलं आहे. मुलीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? यावर पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.सत्यपाल सिंह यांनी या प्रकरणावर खुलासा केलाय. मुलीचा अचानक मृत्यू झाला, हे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack in child) असू शकते. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असं डॉ.सत्यपाल सिंह यांनी म्हटलंय.

लहान वयात हार्ट अटॅक का येतो? (Reason of Heart Attack in child)

जन्मजात हृदयविकाराने जन्मलेल्या मुलांमध्ये छातीत दुखणं, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या मुलांमध्येही अनुवांशिक कारणांमुळे छातीत दुखू शकतं. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची कोरोनरी आर्टरी असामान्य असेल किंवा हृदयाच्या स्नायूशी संबंधित कोणताही आजार असेल तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असू शकतो. जर मुलाला अन्नासंबंधी समस्या येत असेल, थकवा जाणवत असेल, भूक न लागणे, चिडचिड होणे, जुलाब, श्वास घेण्यास त्रास होणे, घाम येणे, उलट्या होणे असा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला देखील डॉक्टर देतात. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.