उत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार

कावडियांच्या (Kanwariyas) वाहनाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यानंतर वीजेचा धक्का लागून 5 जण ठार झाले आहे. यानंतर कावड यात्रेकरुंनी वीज विभागाकडून निष्काळजीपणा कऱण्यात आल्याचा आरोप करत आहे.     

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2023, 01:18 PM IST
उत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना! गाडीवरील स्पीकरचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने कावड यात्रेकरु ठार title=

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. वाहनातील स्पीकरचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का लागून पाच कावड यात्रेकरु ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या भवनपूर परिसरात येथे ही घटना घडली. दरम्यान, वीजेचा धक्का लागून काही यात्रेकरुन जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

कावडिया पवित्र पाणी घेतल्यानंतर हरिद्वार येथून परतत होते. ते मेरठमध्ये दाखल होताच काही वेळात ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर कावडिया संतापले होते. यावेळी त्यांनी रस्ता बंद करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

जिल्हा दंडाधिकारी दीपक मिना यांनी पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसंच जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणावे की, "कावडिया आपल्या गाडीतून रात्री 8 वाजता गावात परतत असताना ही दुर्घटना घडली. गाडीचा काही भाग ओव्हरहेड वायरला स्पर्श झाला". दुर्घटनेनंतर 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यामधील 5 जण ठार झाले आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर कावड यात्रेकरुंसह नागरिकांचाही संताप झाला. परिस्थिती हाताबाहे जाऊ नये यासाठी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार कावडिया ठार आणि अनेक जखमी झाल्यानंतर आता ही दुर्घटना समोर आली आहे. 

दिल्लीत 6 कावडिया जखमी

राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा कावडिया जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पहिल्या घटनेत, दक्षिण-पश्चिम दिल्लीतील वसंत विहार उड्डाणपुलावर एका टॅक्सीने त्याला धडक दिल्याने 38 वर्षीय कावड यात्रेकरु जखमी झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. धर्मेंद्र मेवात असं या जखमीचं नाव असून तो हरियाणाचा आहे, त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचारानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.