यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून ४३ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळल्याने शनिवारी जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jul 5, 2020, 08:58 AM IST
यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून ४३ जणांचा मृत्यू title=
फोटो सौजन्य : ट्विटर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळल्याने शनिवारी जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. परंतु वीज कोसळल्याने 23 जणांचा मृत्यू झाला आहे तर 29 जण होरपळले आहेत.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये आठ, मिर्जापूरमध्ये सहा, भिदोईत सहा, कौशांबीमध्ये दोन तर जौनपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भोजपूर 9, सारण 5, कैमूर 3, पटना 2 तर बक्सरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

याआधी 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने, वादळामुळे मोठी हानी झाली होती. वीज पडून तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशमध्येही वीज कोसळून यापूर्वी 24 जणांचा बळी गेला होता. पटना, मुजफ्फरपूर, भोजपूर, बक्सरसह अनेक जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे येथील काही भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

मुंबईत रात्रभर मुसळधार; कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

 

पटनामधील हवामान खात्याकडून पुढील 48 तासात, राज्यातील अनेक भागात पावसासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतात न जाण्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक भागात 6 जुलैपर्यंत ऑरेंज आणि ब्लू अलर्ट जारी करण्यात आला आहे.