नवी दिल्ली : दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये एका विधवा वृद्ध महिलेची हाणामारी करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे नागरिकांना रात्री जागून चौकीदारी करावी लागत आहे. आग्र्यामधली ही वृद्ध विधवा महिलाच वेणी कापत असल्याचा संशय होता. काहींनी तर ही महिला चुडैल असल्याचीही अफवा पसरवली होती. याप्रकरणामध्ये पोलिसांनी दोन जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मंगळवारी रात्री घडलेली आहे. ६२ वर्षांच्या वृद्ध महिला मानदेवी शौचालयासाठी बाहेर पडली होत्या, पण अंधार असल्यामुळे त्या रस्ता चुकल्या आणि बघेल समाजाच्या वस्तीमध्ये गेल्या. तिकडे झोपलेल्या एका मुलीला पांढऱ्या साडीमधल्या मानदेवी दिसल्या आणि मुलीनं आरडाओरडा केला. गावकऱ्यांना मानदेवी या भूत असल्याचा समज झाला आणि त्यांनी मानदेवींना हाणामारी करायला सुरुवात केली. या हाणामारीमध्ये महिलेच्या डोक्याला लोखंडी दांडा लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गोंधळामध्ये मानदेवीच्या कुटुंबातील काही जणांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं पण मानदेवींचा यामध्ये मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणामुळे गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातल्या नगला अख्खा गावातले गावकरी चौकीदारी करत आहेत. याच गावातल्या एका महिलेची वेणी कापल्याची घटना काल सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मात्र उत्तर भारतामध्ये अफवांचा बाजार गरम झाला आहे. ज्या महिलांच्या नवऱ्याच्या नावाची सुरुवात न अक्षरापासून होत आहे, त्या महिलांची वेणी कापली जात असल्याची अफवाही पसरली आहे.
दिल्लीतल्या तिलनगपूर कोटला भागामध्येही एका महिलेची वेणी कापण्यात आल्याची घटना घडली आहे. तर हरियाणाच्या फरीदाबादमधून अशाच तीन घटना समोर आल्या आहेत. हरियाणाच्याच हिसारमध्येही काल महिलेची वेणी कापल्याची घटना घडली आहे. हिसारमधल्या न्यू योग नगरमध्ये राहणाऱ्या कमला देवींची रात्री झोपलेल्या असतानाच वेणी कापण्यात आली आहे. राजस्थानच्या धौलपूरमध्येही वेणी कापणाऱ्या या गँगची दहशत पसरली आहे.