Stealing iPhone For Girlfriend: गर्लफ्रेण्डला iPhone गिफ्ट करण्यासाठी E-Commerce कंपनीला 10 लाखांचा गंडा; चौघांना अटक

Employees Arrested For Stealing iPhone For Girlfriend: त्याने आधी 2 फोन चोरले. त्यानंतर त्याने कंपनीमधील इतर 3 जणांना या कटात सहभागी करुन घेत वारंवार फोन चोरी करण्यास सुरुवात केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 17, 2023, 02:22 PM IST
Stealing iPhone For Girlfriend: गर्लफ्रेण्डला iPhone गिफ्ट करण्यासाठी E-Commerce कंपनीला 10 लाखांचा गंडा; चौघांना अटक title=
Stealing iPhone For Girlfriend (file photo/ reuters)

Stealing iPhone For Girlfriend: एकेकाळी श्रीमंतांचा फोन अशी ओळख असलेल्या अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची (iPhone) सध्या प्रचंड क्रेझ आहे. हा फोन ईएमआय आणि पूर्वीच्या तुलनेनं कमी किंमत तसेच आर्थिक दृष्ट्या परवडणारे पर्याय उलब्ध असल्याने आता सर्वसामान्यांनाही सहज विकत घेता येतो. तरुणाईमध्येही या फोनची तुफान क्रेझ आहे. मात्र सर्वांनाच हा फोन परवडतो असं नाही. तरी तो घेण्यासाठी अनेकजण खटाटोप करत असतात. याच प्रयत्नांमध्ये काहीजण अगदी चुकीचा मार्गही निवडतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीमध्ये नुकताच समोर आला.

खुलासा ऐकून पोलीस चक्रावले

दिल्लीमध्ये एका ई-कॉमर्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचे मोबाइल फोन चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या 4 जणांनी ईशान्य दिल्लीतील बिंदापूर येथे असलेल्या ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयामधून अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयफोन चोरी केली. या आरोपींपैकी दोघे जण अवघ्या 22 वर्षांचे आहेत. या दोघांची नावं मनीष आणि अमन अशी आहेत. दिलीप (38) आणि संजय (33) अशी अटक करण्यात आलेल्या अन्य 2 व्यक्तींची नावं आहेत. हे चौघेही एकमेकांचे मित्र असून ते दिल्लीतील वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आल्यानंतर चौघांनी केलेला खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले.

एकूण 7 फोन चोरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा चोरी करण्याचा प्लॅन मनीषने बनवला होता. मनीषला त्याच्या गर्लफ्रेण्डला आयफोन गिफ्ट करायचा होता. तपासादरम्यान मनीषची चौकशी करण्यात आली असताना त्याने ऑफिसमधून 2 आयफोन चोरल्याचं कबूल केलं. मात्र त्यानंतर सोप्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी अशाप्रकारे फोन चोरण्याचा मार्ग चांगला असल्याचं मनीषला वाटलं आणि त्याने त्याच्या 3 मित्रांना या कटात सहभागी करुन घेतलं. तो वरचेवर फोनची चोरी करु लागला. तो फोन चोरी करुन या तिघांकडे द्यायचा. हे तिघेही याच कंपनीत कामाला होते. या चौघांनी मिळून 7 महागडे अ‍ॅण्ड्रॉइड फोन आणि 7 आयफोन चोरले. 

...अन् तक्रार दाखल झाली

मागील आठवड्यामध्ये गुरुवारी कंपनीच्या ऑफिसमध्ये ऑडिट करण्यात आलं असता त्यावेळी अनेक फोन गायब असल्याचं मनीष पंत या मॅनेजरच्या लक्षात आलं. या प्रकरणासंदर्भातील तक्रार मनीष पंत यांनी पोलिसांना दिली. कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं असता कंपनीतील 4 कर्मचारीच महागडे फोन लंपास करत असल्याचं उघड झालं. हे 4 ही चोर लंपास केलेले आयफोन विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तम नगरमधील नजफगढ रोडवर मेट्रो पिलर 730 जवळ सापळा रचला. त्यावेळी फोन विक्रीचा प्रयत्न करणारे आरोपी त्यांच्या तावडीत सापडले. 

तिघे चोरायचे फोन एकजण विकायचा

या ठिकाणी पोलिसांना मनिष, अमन आणि दिलीप यांना अटक करण्यात यश आलं. या तिघांकडे एकूण 5 फोन सापडले. यात 2 आयफोन आणि 3 अ‍ॅण्ड्रॉइड फोनचा समावेश होता. या तिघांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी चौथा आरोपी संजय याच्याबद्दल सांगितलं. पोलिसांनी संजयलाही अटक केली. त्याच्याकडूनही 2 आयफोन पोलिसांनी जप्त केले. मनिष, अमन आणि दिलीप ऑफिसमधून फोन चोरी करायचे आणि त्यानंतर संजय बाजारामध्ये हे फोन विकायचा असं तपासादरम्यान स्पष्ट झालं.