डेहराडूनमध्ये विषारी दारुने ६ जणांचा मृत्यू; अधिकारी निलंबित

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Updated: Sep 21, 2019, 02:29 PM IST
डेहराडूनमध्ये विषारी दारुने ६ जणांचा मृत्यू; अधिकारी निलंबित title=
संग्रहित फोटो

डेहराडून : उत्तराखंडची (uttarakhand) राजधानी डेहराडूनमध्ये (Dehradun) शुक्रवारी विषारी दारु पिण्याने ६ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे आयपीएस अशोक कुमार यांनी, शुक्रवारी दारु पिण्यानंतर अनेकांची तब्येत बिघडल्याचे सांगितले. त्यानंतर कारवाई करत याबाबत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व देशी दारूचे अड्डे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून याप्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. सुजात हसन, सतर्कता मनोहर फर्त्याल, मनोज भट्ट या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मृत्यू झालेल्यांपैकी अधिकतर लोक डेहराडून आणि आसपासच्या भागातील असल्याचे बोलले जात आहे. संतापलेल्या नागरिकांकडून स्थानिक आमदाराच्या निवासस्थानी घेरावही घालण्यात आला. काही बाहेरच्या लोकांनी विषारी दारू दिल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी हरिद्वारमध्ये ४० हून अधिक लोकांचा विषारी दारुने मृत्यू झाला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत दारुमध्ये मिथेनॉल असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले होते.