धोका वाढला; देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. 

Updated: May 2, 2020, 09:44 AM IST
धोका वाढला; देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ title=

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे (Coronavirus) २२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता पहिल्यांदाच हा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
 
कोरोनामुळे आतापर्यंत १२१८ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ पाहता, हा इशारा खरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...

देशभरात महाराष्ट्र हे सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या आकेडवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ११,५०६ इतकी झाली होती. महाराष्ट्रातही काल एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ (१००८) पाहायला मिळाली होती.

केंद्र सरकारने कालच देशातील लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आँरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्यात आले होते. तसेच परराज्यांत अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी जाऊन देण्यासाठी सशर्त मंजुरी देण्यात आली होती.