मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आसाममध्ये प्रचंड विनाश झाला आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोकं जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती हे प्रामुख्याने दक्षिण आसाममधील बराक घाट भागातील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. मदत व बचाव कार्य प्रगतीपथावर आहे.
भूस्खलनामुळे मरण पावलेल्यांमध्ये कछार जिल्ह्यातील सात, हैलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मंगळवारी बराक घाट येथे भूस्खलन झाले आणि त्यात २० लोकांचा मृत्यू झाला.
आसाममधील नागरिकांना आधीच पुराचा फटका बसला आहे आणि सुमारे ३.७२ लाख लोक प्रभावित आहेत. अनेकांनी शिबिरात आश्रय घेतला आहे. या पुराचा सर्वाधिक परिणाम गोलपारा जिल्ह्यात झाला असून त्यानंतर नागाव आणि होजाई जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. पूरात ९ लोकांचा मृत्यू झाला असून ३४८ गावे जलमय झाली आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) म्हटले आहे की, सुमारे २७००० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पाऊस थांबल्यानंतर पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या ११ वरून ३ वर आली आहे. गोलपारा जिल्ह्यात १.४८ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.