बंगळुरु : कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. 15 मेला निकाल आल्यानंतर सत्ता कोणाच्या हाती येईल हे सांगणं कठीण झालं होतं पण सरकार स्थापन झाल्यानंतर ही ते स्थिर राहिल का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सगळ्यात आधी भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला पण 2 दिवसात येडियुरप्पा यांचं सरकार पडलं. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले पण त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मंत्रीपदावरुन वाद सुरु झाले.
आता जेडीएसमध्ये नाराजी समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षाचे 2 नेते नाराज आहेत. जीटी देवगौडा आणि सीएस पुत्ताराजू यांना देण्यात आलेल्या विभागावर ते नाराज आहेत. जीटी देवगौडा यांना उच्च शिक्षण आणि पुत्ताराजू यांना लघु सिंचन विभाग देण्यात आलं आहे.
देवगौडा यांनी मैसूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया यांना पराभूत केलं होतं तर पुत्ताराजू यांनी लोकसभा सीट सोडत विधानसभा निवडणूक लढवली. त्यांना परिवहन मंत्रालय देण्यात येणार होतं पण जेडीएस सुप्रीमो एचडी देवगौडा यांचे नातेवाईक डीसी तमन्ना यांना परिवहन विभाग दिल्याने ते देखील नाराज आहेत.
दोन्ही मंत्र्य़ांच्या समर्थकांनी त्यांच्या मतदारसंघात विरोध प्रदर्शन केलं आणि महत्वपूर्ण मंत्रालय देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी यावर म्हटलं की, 'फक्त माध्यमांमध्ये अशा बातम्या आहेत. कोणताही मंत्री नाराज नाही. काही लोकांना विशेष विभागात काम करायचं आहे. पण सगळ्याच विभागांमध्ये चांगलं काम करण्य़ाची संधी आहे. प्रत्येकाला त्यांच्य़ा इच्छेप्रमाणे विभाग नाही मिळणार.'