राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शिवसेनेसह 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांचा बहिष्कार 

Updated: Jan 28, 2021, 10:25 PM IST
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शिवसेनेसह 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार title=

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 पक्षांनी बहिष्कार घातला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात हा बहिष्कार घालण्यात आला आहे. काँग्रेससह 16 पक्षांनी बहिष्काराची घोषणा केला आहे. शिवसेनाही बहिष्कार घालणार आहे. राष्ट्रपतींचं उद्या संसदेत अभिभाषण होणार आहे.

शुक्रवारी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात कृषी सुधार कायद्याच्या मुद्यावर वाद होण्याची शक्यता आहे. 16 विरोधी पक्षांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने शुक्रवारी संसदेत राष्ट्रपतींच्या संयुक्त अभिभाषणावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आणि शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शविला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानीत शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारात केंद्र सरकारच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी या विरोधी पक्षांनी केली.

दरम्यान, आम आदमी पार्टी आणि अकाली दलानेही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी 16 विरोधी पक्षांच्या संयुक्त निर्णयाची घोषणा केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार्‍या प्रमुख पक्षांमध्ये तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, द्रमुक, समाजवादी पार्टी, माकप, सीपीआय आणि आरजेडी हे आहेत.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार ते म्हणाले की, राष्ट्रपती हे पक्षीय राजकारणापेक्षा वरचे आहेत. आम्ही विरोधकांना संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करतो.'