जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान, दोन जवान शहीद

या चकमकीमध्ये अजून दोन जवान जखमी झाले आहेत.

Updated: Feb 12, 2019, 12:12 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान, दोन जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार बलजित आणि सनीद यांचा समावेश आहे. या चकमकीमध्ये अजून दोन जवान जखमी झाले आहेत. पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात ही चकमक सुरू आहे. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्यानं शोधमाहीम सुरू आहे.

याआधी उरी येथे असणाऱ्या सैन्यदलाच्या तळाळील परिसरामध्ये रविवारी रात्री काही संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या होत्या. ज्यानंतर दोन संशयास्पद व्यक्तींचा वावर या परिसरात पाहण्यात आल्याचं म्हटलं जात असून, या परिसरावर सैन्यदलाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. उरी येथील सैन्यदलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर या परिसरात कायमच सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. संबंधित परिसरात सैन्यदलाकडून शोधमोहिम सुरु होती.

याआधी रविरवारीही सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाम येथे चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. जेथे सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्यदलाला यश मिळालं. जवळपास सहा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कारवाईमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. दरम्यान, संबंधित परिसरामध्ये सुरभेच्या कारणावरून काही वेळासाठी मोबाईल आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या.