आनंदाश्रू का येतात? यामागेही आहे विज्ञान...; माहितीये का?

आनंदात असताना का बरं रडू येतं?   

Updated: Mar 20, 2022, 04:52 PM IST
आनंदाश्रू का येतात? यामागेही आहे विज्ञान...; माहितीये का?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अनेकदा आपण इतके भावनिक होतो, की आपल्या मनातील भावना या अश्रूंवाटे अर्थात डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यावाटे व्यक्त होतात. फक्त वाईट वाटतं तेव्हाच नव्हे, तर अतिशय आनंद होतो तेव्हाही डोळ्यात पाणी येतं. आपण यांना आनंदाश्रू असंही म्हणतो. पण, यामागे विज्ञानही दडलंय याचा विचार कधी केला आहे का तुम्ही ? 

अश्रू येण्याची दोन कारणं 
एका अहवालानुसार डोळ्यांत पाणी येण्यामागे दोन कारणं असतात. यातील पहिलं कारण म्हणजे जेव्हा आपण खळखळून हसतो तेव्हा आपल्या चेहऱ्याच्या पेशी अमर्याद काम करु लागतात. 

असं होताच आपल्या अश्रू ग्रंथींचं (Lacrimal Glands) मेंदूवर असणारं नियंत्रण सुटतं आणि डोळे पाणावतात. 

यामागचं दुसरं कारण म्हणजे, जोरजोरात हसल्यामुळंही एखादी व्यक्ती भावनिक होते. असं झाल्यास चेहऱ्याच्या पेशींवर वाढीव दबाव पडतो. याच कारणामुळं तुमच्या डोळ्यांतून अश्रू येतात. अश्रूंवाटे आपलं शरीर तणावात संतुलन आणण्याचा प्रयत्न करत असतो. 

हार्मोन्सचा मोलाचा वाटा 
कमी अथवा जास्त भावनिक होण्यामागे शरीरातील हार्मोन्सची मोलाची भूमिका बजावतो. हसण्यामुळं मेंदूचा जो भाग सक्रिय होतो तोच भाग रडतानाही सक्रिय होतो. 

सतत हसण्या - रडण्यामुळं मेंदूतील पेशींवर अधिक तणाव येतो. अशात शरीरातील कार्टीसोल आणि एड्रिनालाइन नावाचे हार्मोन्स स्त्रवतात. हेच हार्मोन्स हसताना किंवा रडताना शरीरात होणाऱ्या प्रतिक्रियेसाठीही जबाबदार ठरतात. 

हे तर कधीच ऐकलं नसेल.... 
तुम्हाला माहितीये का, आनंदात रडू आल्यास पहिला अश्रू उजव्या डोळ्यातून येतो. तर, दु:खी असल्यास पहिला अश्रू डाव्या डोळ्यातून घरंगळतो. आहे की नाही ही रंजक माहिती?