प्रवासादरम्यान होतो उल्ट्यांचा त्रास; या गोष्टी नेहमी सोबत ठेवा

 अनेकांना प्रवास करायचं म्हटलं की उल्ट्यांचा त्रास होतो. 

Updated: Jun 26, 2021, 07:50 AM IST
 प्रवासादरम्यान होतो उल्ट्यांचा त्रास; या गोष्टी नेहमी सोबत ठेवा title=

मुंबई : विकेंड आला आहे आणि अनेकांनी विकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे. सध्या पाऊस देखील आहे त्यामुळे तुमचाही कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लॅन तयार असेलच...मात्र अनेकांना प्रवास करायचं म्हटलं की उल्ट्यांचा त्रास होतो. जर तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

या उल्टीच्या त्रासामुळे फिरायला जाण्याच्या आठवणीही चांगल्या नसतात. बहुतांश लोकं या त्रासामुळे प्रवास करणं टाळतात. हा त्रास दूर करण्यासाठी आम्ही खास तुम्हाला टीप्स देणार आहोत.

पुदीना करेल मदत

आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, प्रवास करताना चक्कर येणं, उलट्या होणं आणि मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर पुदीना तुमची मदत करू शकतो. प्रवासात पुदीन्याचं सिरप तुमच्यासोबत ठेवा आणि प्रवास करण्यापूर्वी प्या. तुम्हाला हवं असल्यास पुदीनाच्या गोळ्यांची मदत देखील घेऊ शकता.

लिंबू-मीठ

प्रवास करताना मळमळ आणि उलट्या झाल्यास आपण लिंबाचा रस पाण्यात पिळून त्यामध्ये मीठ घालून सेवन करू शकता. प्रवासात जाण्यापूर्वी आपल्याबरोबर लिंबू, मीठ आणि पाणी घेऊन जाण्यास विसरू नका.

आंबट फळं आणि ज्यूस

प्रवास करत असताना लिंबूवर्गीय फळं किंवा त्यांचा ज्यूस सोबत ठेवा. जेव्हा तुम्हाला उलट्या, चक्कर येणं आणि मळमळ होण्याची समस्या जाणवेल तेव्हा त्याचं सेवन केलं पाहिजे. यामुळे तुम्हाला उल्ट्यांच्या त्रासापासून आराम मिळेल.

आलं

प्रवासादरम्यान उल्ट्यांच्या त्रासावर आलं नक्कीच मदत करेल. आलं सोलून घ्या आणि त्याचे तुकडे करा. प्रवासादरम्यान हे तुकडे तुमच्यासोबत ठेवा. प्रवास करताना उलट्या, चक्कर येणं आणि मळमळ होण्याची समस्या येते तेव्हा आल्याचे तुकडे तोंडात ठेवून चोखा.