दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून मेगा वॅक्सिनेशन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लसीकरणासदंर्भात नवीन विक्रम करण्यात आला आहे. यावेळी 17 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी 1.30 वाजेपर्यंत लस घेणाऱ्यांचा आकडा 1 करोडच्या पार गेला होता.
याचवेळी, दुपारी 2.30 पर्यंत हा आकडा 1.25 कोटींच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा भाजपने आधीच केली होती. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, या दिवशी देशभरात मेगा लसीकरणाचा विशेष कार्यक्रम चालवला जाईल.
देशभरात या मेगा लसीकरणासाठी भाजपने 6 लाखांहून अधिक स्वयंसेवकांची टीम तयार केली आहे. हे स्वयंसेवक इतर नागरिकांना या लसीकरण मोहिमेत सामील होण्यास मदत करत आहेत. हे स्वयंसेवक लोकांना लसीकरणाच्या रांगेत पोहोचण्यासाठी आणि त्यांना सोयीस्करपणे लसीकरण करण्यास मदत करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात 2 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं भाजपचं लक्ष्य आहे.
दरम्यानच्या काळात अनेक विकसित देशांनी कोविड -19 विरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर हा प्रश्न समोर येऊ लागला आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस भारतात कधी दिला जाईल. यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असं स्पष्ट केलं आहे की, सध्या भारताची प्राधान्यता कोरोना लसीचे दोन्ही डोस सर्व लोकांना देणं आहे. वर्षाच्या अखेरीस प्रत्येकाला लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. सध्या बूस्टर डोससंदर्भात वैज्ञानिकांच्या चर्चेचा हा केंद्रीय विषय नाही.