मुंबई : आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. योगसाधनेचे मुळ हे भारतात आहे. योग हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ५ हजार वर्षांपासून योग हा आपल्या जीवनशैलीत समाविष्ट आहे. योगसाधनेमुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही उत्तम राहते. मन शांत राहते. तर आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जाणून घेऊया योगदिनाबद्दलच्या काही खास गोष्टी...
योग ही भारतीय संस्कृती असली तरी आज योग दिवस फक्त भारतात नाही तर जगभरात साजरा केला जातो. योगदिनाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदींनी संयुक्त राष्ट्र महासभेत २७ डिसेंबर २०१४ मध्ये जगभरात एकत्र योगसाधना करण्याचा प्रस्ताव मांडला. ३ महिन्याच्या आत या प्रस्तावाची घोषणा झाली. ११ डिसेंबर २०१४ ला '२१ जून' हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर करण्यात आला.
अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल. पण यामागे काही खास कारण आहे. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. भारतीय परंपरेनुसार या दिवशी ग्रीष्म संक्रांत असते. या दिवसापासून दक्षिमायन सुरु होते. सुर्याच्या दक्षिमायनामध्ये आधात्मिक सिद्धी प्राप्त करणे अत्यंत लाभदायी ठरते. म्हणून योगदिनासाठी २१ जूनची निवड करण्यात आली.
२१ जून २०१५ ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सुमारे ३५ हजाराहून अधिक लोकांनी आणि ८४ देशांच्या प्रतिनिधिंनी दिल्लीच्या राजपथावर योगाची २१ आसने केली होती. या खास आयोजनामुळे दोन गिनीज बुक रेकॉर्ड बनवले आहेत. पहिला रेकॉर्ड ३५,९८५ लोकांनी एकत्र योगसाधना केल्याचा आणि ८४ देशातील लोकांनी यात सहभाग घेतल्याने दुसरा रेकॉर्ड बनला.