मुंबई : सध्या भारतात टोमॅटो फ्लूचे रुग्ण वाढताना आहेत. लहान मुलांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आता केंद्र सरकारने एक सूचना जारी केलीये. या अॅडव्हायझरीमध्ये सर्व मार्गदर्शक तत्त्वं देण्यात आली आहेत, ज्यांचं पालन करणं आवश्यक आहे. यामध्ये केंद्र सरकारने सविस्तर अहवाल जारी करून सरकारने टोमॅटो फ्लूची लक्षणं आणि उपचारांबाबतही माहिती दिलीये.
टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य संसर्ग असून त्यामध्ये टोमॅटोच्या आकाराचे फोड शरीरावर दिसून येतात. त्याची बहुतेक लक्षणे इतर व्हायरल इन्फेक्शन सारखीच राहतात. यामध्ये ताप, पुरळ, सांधेदुखी, थकवा, सुजलेले सांधे, घसा खवखवणं यांचा समावेश होतो.
हा व्हायरस सौम्य तापाने सुरू होतो आणि त्यानंतर घसा खवखवण्याचा त्रास देखील सुरू होते. तापाच्या दोन-तीन दिवसांनंतर शरीरावर लाल रंगाचं पुरळ दिसू लागतात. मुख्यतः तोंडात, जिभेवर किंवा हिरड्यांमध्ये हे फोड येतात.
सध्या हा व्हायरस संसर्गाचा एक प्रकार मानला जातोय. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा सोर्स हा व्हायरस आहे, परंतु तो कोणत्या व्हायरसमुळे पसरतोय किंवा कोणत्या व्हायरसशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.