World Diabetes Day- मधूमेहींंच्या बॅगेत या '7' गोष्टी असायलाच हव्यात !

मधूमेह हा सायलंट किलर समजला जाणार आजार आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 14, 2017, 09:24 AM IST
World Diabetes Day- मधूमेहींंच्या बॅगेत या '7' गोष्टी असायलाच हव्यात !  title=
thehealthsite

मुंबई : मधूमेह हा सायलंट किलर समजला जाणार आजार आहे. 

आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्हांला काही गोष्टी नियमित तुमच्या जवळ ठेवणं गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अचानक काही त्रास झाल्यास स्वतःला प्राथमिक मदत करू शकता.  

गोड पदार्थ - अचानक रक्तातील साखरेचं  प्रमाण कमी झालं तर? यासाठी तुमच्याजवळ किमान एखादं ग्लुकोज बिस्किटं, खडी साखर, कणी गूळ किंवा चॉकलेट असल्यास तुम्हांला मदत होऊ शकते. 

पाणी - लहान अंतरासाठीदेखील बाहेर पडत असाल तर तुमच्याजवळ पाण्याची बाटली ठेवा. कारण मधूमेहींना सतत तहान लागते. त्रास टाळण्यासाठी सतत हायड्रेटेड रहा. 

ग्लुकोमीटर - अचानक तुम्हांला थकल्यासारखं, गळल्यासारखं वाटतं असेल तर तुमच्या रक्तातील साखर तपासून पहा. त्यासाठी ग्लुकोमीटर फायदेशीर ठरतं. 

प्रथमोपचार पेटी - मधूमेहींना लहानशा जखमेकडेही दुर्लक्ष करणं त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे इंफेक्शन टाळण्यासाठी तुमच्याजवळ कापूस,  बॅन्डेज, अ‍ॅन्टीसेप्टिक अशा गोष्टी ठेवा. 

रिडींग ग्लास - तुमची दृष्टी कमजोर झाली असेल तर चष्मा मूळीच विसरू नका. पण त्यासोबतच किमान काही वाचता यावं याकरिता एक रिडींग ग्लासदेखील तुमच्यासोबत ठेवा. म्हणजे औषधं, हॉटेलमधील मेन्यु कार्ड अशा लहानसहान गोष्टी वाचताना पंचाईत होणार नाही.  

आयकार्ड - तुमच्या जवळ असलेल्या बॅगेत एक आयकार्ड ठेवा. किमान त्यामध्ये तुमच्याव्यतिरिक्त एखाद्या जवळच्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता अशी महत्त्वाची माहिती असणं गरजेचे आहे. 

औषधं - तुमच्या औषधाचं प्रिस्क्रिब्शन, गोळ्या आणि इन्सुलिनचं पेन किंवा इंजेक्शन अवश्य तुमच्याजवळ ठेवा. यामुळे अनेक इमरजंसी स्थितीमध्ये तुम्हांला मदत करणं  सोप्पं होते.