Study Tips : जवळपास सर्वच शाळांमध्ये सामाहिक परीक्षा (Exam) होऊन गेल्या आहेत आणि आता तयारी सुरु झाली आहे ती अंतिम परीक्षेची. विशेषत: 10 आण 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं वर्ष असतं. शाळा, ट्यूशनबरोबरच विद्यार्थी (Student) घरी देखील बराच वेळ अभ्यासात घालवतात. पण घरी अभ्यास करताना जवळपास सर्वच पालक आपल्या पाल्याला सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. काही विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत जागून अभ्यास करतात, तर काही विद्यार्थी जसा वेळ मिळेल तसं आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतात. पण सकाळी लवकर उठून केलेल्या अभ्यासामुळे नेमका काय फायदा होतो, पालक असा सल्ला आपल्या मुलांना का देतात. चला तर जाणून घेऊया.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा, याचे अनेक फायदे आहेत, रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठल्याने मूड फ्रेश असतो शिवाय तब्येसाठीही ते चांगलं असतं.
मन शांत आणि एकाग्रता मिळते
सकाळी लवकर उठल्याने मन प्रसन्न असतं आणि सकाळच्या शांत वातावरणात एकाग्रतेने अभ्यास करता येतो. पहाटेच्या वेळेत आपण जो अभ्यास करतो त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करता येतं, त्यामुळे विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढते, विशेषत: केलेला अभ्यास लक्षात रहातो.
सकाळचं शांत वातावरण
सकाळी उठून अभ्यास करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सकाळचं वातावरण शांत असतं. यावेळेत कोणत्याही प्रकारचा गोंगाट नसतो, त्यामुळे अभ्यासातही कोणतीही बाधा येत नाही. याऊलट दिवसभरात कोणत्याही वेळेत अभ्यास करताना घरात किंवा इतर कोणत्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूच्या आवाजाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पहाटे केलेला अभ्यास विद्यार्थ्यांना जास्त लक्षात राहतो.
दुसऱ्या कामासाठी वेळ मिळतो
पहाटे लवकर उठून अभ्यास केल्याने तुमच्याकडे भरपूर वेळ शिल्लक रहातो. त्यामुळे तुम्ही इतर कामांचंही नियोजन करु शकता. दिवसभरात ज्या वेळेत तुम्ही अभ्यास करता, तो वेळ तुम्ही अभ्यासाशी निगडित इतर गोष्टींवर खर्च करु शकता. सकाळची वेळ ही एनर्जेटिक असल्याने पाठांतरासही मदत होते.
तब्येत चांगली राहते
सकाळी लवकर उठून अभ्यास करणं चांगलं तर आहेत, शिवाय आरोग्याच्यादृष्टीनेही लाभदायक आहे. सकाळी लवकर उठल्याने दिवसभराचा आळस निघून जातो. अभ्यासाबरोबच तुम्ही वेळ व्यायामही करु शकता. ज्यामुळे शरीरही निरोगी राहिल.