मुंबई : आजकाल मातृभाषेपेक्षा इतर भाषा आपल्याला प्रिय वाटू लागल्या आहेत. इंग्रजीचं तर फारच अवडंबर माजवल जात असताना आपण सगळेच पाहतो. आपल्या अगदी लहानग्यालाही उत्तम इंग्रजी बोलता यावं, यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो. इंग्रजी भाषेचं महत्त्व कोणी नाकारत नाही. पण इंग्रजीचा अट्टाहास मात्र चुकीचा आहे.
मुलाला उत्तम इंग्रजी यावं, म्हणून लहानपणापासूनच त्याच्याशी इंग्रजीत बोललं जातं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं जातं. पण तुमची ही वागणूक कितपत योग्य आहे, हे दाखवणारा एक शोध समोर आला आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये झालेल्या शोधात असे समोर आले आहे की, जी मुले घरी आपल्या मातृभाषेत संवाद साधतात ती अधिक बुद्धिवान असतात. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगचे संशोधन आणि असोसिएट प्रोफेसर मायकल डायर म्हणतात की, जी मुले घरी मातृभाषेत आणि शाळेत वेगळ्या भाषेत बोलतात ते मातृभाषेत न बोलणाऱ्या मुलांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात.
यासाठी त्यांच्या टीमने ७-११ वर्षांच्या १०० तुर्की मुलांवर हा प्रयोग केला. त्यातून असे सिद्ध झाले की, मातृभाषेत बोलणाऱ्या मुलांचा आयक्यू फक्त इंग्रजी बोलणाऱ्या मुलांच्या तुलनेत उत्तम होता.