पालकांनो सावधान! नुकतीच कोरोनामुक्त लहान मुलांच्या त्वचेवर दिसून येतायत अशी लक्षणं

लहान मुलांना दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. 

Updated: Jun 7, 2021, 06:09 PM IST
पालकांनो सावधान! नुकतीच कोरोनामुक्त लहान मुलांच्या त्वचेवर दिसून येतायत अशी लक्षणं title=

मुंबई : देशभरात अनेकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. मुख्य म्हणजे मोठ्या व्यक्तींसोबत लहान मुलांना देखील दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. कोरोनाच्या उपचारांनंतर लहान मुलं बरी झाली आहे. मात्र बरं झाल्यानंतर लहान मुलांना मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोम होत असल्याचं समोर आलं आहे. मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोम हे सूज येण्याशी संबंधित असून यावर उपचार करणं गरजेचं आहे. यावर झालेल्या रिसर्चनुसार, मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोमची लक्षणं ही त्वचेवर दिसून येतात.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोमची अधिक प्रकरणं ही कोरोना बरा झाल्यानंतर दिसून आली आहेत. ज्यावेळी इम्यून सिस्टिम कोरोना इन्फेक्शनशी लढा देतं त्यावेळी सर्व शरीरात सूज पसरते आणि तेव्हाच ही परिस्थिती निर्माण होते. हे सूज येण्याचे संकेत ताप, डोकेदुखी तसंच पोटासंबंधीच्या तक्रारींनी समोर येतात. JAMA डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, लहान मुलांमध्ये मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोमच्या सुरुवातीच्या लक्षणांना त्वचेवर असलेल्या म्‍यूकस मेंब्रेनद्वारे आढळून येऊ शकतात.

मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोमने ग्रस्त रूग्णालयात दाखल असलेल्या 35 मुलांमधील लक्षणं पाहून अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला. यामध्ये 83 टक्के रूग्णांमध्ये त्वचेवर लक्षणं दिसून आली. मल्टी इन्फ्लामेट्री सिंड्रोमची त्वचेवर दिसून येणारी लक्षणं

1. ओठ फाटणं

2. हात तसंच पायाला सूज येणं

3. शरीरावर रॅशेज येणं

4. हात आणि पायांजवळच्या त्वचेचा रंग उडणं

5. जीभेचा रंग स्ट्रॉबेरीप्रमाणे गुलाबी होणं

यानंतर संशोधकांनी पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. जर लहान मुलांच्या त्वचेवर अशा प्रकारची लक्षणं दिसून येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करून घ्यावेत.