मुंबई : गेल्या वर्षापासून कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. कोरोनापासून संरक्षण व्हावं यासाठी मास्कचा वापर सक्तीचा केला आहे. त्यानुसार जवळपास गेल्या वर्षभरापासून आपण मास्कचा वापर करतोय. मास्कच्या वापराने आपला कोरोनापासून बचाव होतोय खरा मात्र दुसरीकडे चेहऱ्याच्या त्वचेला काही प्रमाणात नुकसान होत असल्याचं निदर्शनास आलंय.
यासंदर्भात माहिती देताना मुंबईतील नायर रूग्णालयाच्या त्वचारोग विभागातील प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. चित्रा नाईक म्हणाल्या, "मास्कचा सतत वापर केल्याने घाम तसंच ऑईल चेहऱ्यावर राहतं. यामुळे पुरळं येणं किंवा चेहऱ्याला खाज येणं अशा समस्या लोकांमध्ये दिसून येतात. वैद्यकीय कर्माचाऱ्यांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसतो."
डॉ. चित्रा पुढे म्हणाल्या, "काही जणांना मास्कच्या मटेरियलमुळेची त्रास होतो. मास्क सतत चेहऱ्यावर घासला गेल्याने रॅशेस येण्याची तक्रार निर्माण होते. यावर उपचार म्हणून औषधं किंवा क्रिम देण्यात येतं. त्याचप्रमाणे या रूग्णांना कापडी मास्क लावून त्यावर एन 95 मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो."
मास्क घातल्यामुळे होणाऱ्या समस्यांपासून कसं दूर रहाल
महिलांना मेकअप करण्याची फार आवड असते. मात्र मेकअप करून मास्क घातल्यास चेहऱ्याला खाज येऊ शकते. चेहऱ्यावर मेकअपच्या लेअरमुळे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन फार कमी होतं. यामुळे त्वचेला रॅशेस येऊन खाज येऊ शकते.
नारळाचं तेल थंड मानलं जातं. त्यामुळे जर मास्क लावून तुमच्या चेहऱ्याला खाज येत असेल तर त्या भागाला नारळाचं तेल लावा.
स्टीम घेतल्याने त्वचेला फार फायदा होतो. सतत मास्क वापरल्याने चेहऱ्यावर पुरळ उठते. मात्र स्टीम घेतल्याने ही तक्रार उद्भवत नाही. यामध्ये तुम्ही चेहऱ्याला अॅलोवेरा जेल लावूनही स्टीम घेऊ शकता.