जाणून घ्या, Test न करता घरच्या घरीच कशी ओळखाल Pregnancy ची लक्षणं

गर्भधारणेच्या 6 ते 12 दिवसांपर्यंत या वेदना जाणवू शकतात.   

Updated: May 12, 2022, 05:45 PM IST
जाणून घ्या, Test न करता घरच्या घरीच कशी ओळखाल Pregnancy ची लक्षणं title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : मातृत्त्वाची चाहूल स्त्रीच्या अस्तित्वाला पूर्णरुप देणारी ठरते असं म्हणतात. म्हणूनच जेव्हाही आपल्या जवळची कोणीही महिला गरोदर असल्याचं वृत्त कानी पडतं तेव्हा आपलाही आनंद ओसंडून वाहतो. पण, हा आनंद किंवा ही चाहूल तेव्हा नकोशी वाटते जेव्हा गरोदरपणाचा बेत दूरदूरपर्यंत विचारातही नसतो. 

अनावधानानं काही गोष्टी घडून गेल्यानंतर मग पश्चातापाची वेळ येते आणि मग, एकमेकांवर आरोप करण्याचं काम जोडीदार करु लागतात. पण, ही वेळ येण्याआधीच सजग होता आलं तर किती आयुष्य सुखी होतील .... हा विचार तरी केलाय का ? 

अवेळी गर्भधारणा झाल्यास आणि ती लक्षातही आल्यास काही गोष्टींच्या सहाय्यानं वेळ थोपवून नेता येऊ शकते. यासाठी काही मुद्दे लक्षात असणं गरजेचं. चला पाहूया हेच अतिमहत्त्वाचे मुद्दे आणि चाचणी न करता घरच्या घरीच गर्भधारणा झाल्याचं ओळखण्याचे मार्ग... 

सकाळच्या वेळी मळमळ- जेव्हाही एखादी महिला गरोदर असते (Pregnancy) तेव्हा मळमळ हे तिचं प्राथमिक लक्षण असतं. सकाळच्या वेळी झोपून उठल्यानंतर तिचं डोकं भणभणू लागतं, मळमळ होते कोणत्याही कामात मन लागत नाही. 

वारंवार लघवीला होणे- गरोदरपणाचं आणखी एक लक्षण म्हणजे महिलेला वारंवार लघवीला होते. कारण, ज्यावेळी गर्भधारणा होते तेव्हा महिलेच्या गॉल ब्लॅडरमध्ये अधिक प्रमाणात द्रव्य पदार्थ एकवटतो. ज्यामुळं वारंवार लघवीला येते. 

मासिक पाळीची तारीख चुकणे- महिलांना दर महिन्याला जवळपास ठराविक तारखेला मासिक पाळी येते. पण, असं न झाल्यास आणि शरीरसंबंधांनंतर सलग दुसऱ्या महिन्यात पाळीची तारीख चुकल्यास ही गरोदरपणाची लक्षणं ठरु शकतात. 

कोणतंही काम करण्याची इच्छा न होणे- जेव्हाही महिलेला गर्भधाराणा होते तेव्हा शरीराला ही बाब स्वीकारण्यासाठी अपेक्षित वेळ लागतो. ज्यामुळं महिलेला थकवा जाणवू लागतो. अंगदुखी आणि अवघडलेपणा जाणवू लागतो. कोणतंही काम करण्याची इच्छा उरत नाही.

पोटदुखी- गर्भधारणा होताच फर्टिलाइज्ड एग महिलेच्या यूटरसला जोडून असणाऱ्या एका पडद्याशी चिकटतं आणि हळुहळू आतल्या आत मोठं होतं. ज्यामुळं महिलेच्या पोटात काहीशा वेदना जाणवू शकतात. गर्भधारणेच्या 6 ते 12 दिवसांपर्यंत या वेदना जाणवू शकतात. 

संभोगाच्या वेळी सुरक्षित निरोधकांचा वापर न केल्यास शारीरिक संबंधांनंतरच्या काळात ज्यावेळी एखाद्या महिलेमध्ये अशा प्रकारचे बदल दिसू लागतात तेव्हा ही गरोदरपणाची प्राथमिक लक्षण असल्याची बाब नाकारता येत नाही. यासाठी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं कायमच प्राधान्यस्थानी असावं. 

(वरील माहिती सर्वसामान्य निरिक्षणांच्या आधारे लिहिण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही)