राज्यात लसींचा तुटवडा असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर केंद्र सरकार म्हणतं...

राज्यात लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे

Updated: Jan 14, 2022, 08:44 PM IST
राज्यात लसींचा तुटवडा असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर केंद्र सरकार म्हणतं... title=

Maharashtra Vaccination : महाराष्ट्रात लसींचा  (Vaccine) तुटवडा असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी काल पंतप्रधानांच्या बैठकीत सांगितलं होतं. राज्याला 50 लाख कोविशिल्ड (covishield)आणि 40 लाख कोव्हॅक्सिनची (covaxin) लसींची गरज असल्याची माहिती टोपे यांनी दिली होती. 

त्यानंतर आता टोपेंच्या मागणीवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारने (Central Government) एक प्रेस रिलीज काढून यावर उत्तर दिलं आहे. 

काय म्हटलंय केंद्र सरकारने?
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे प्रसारमाध्यमांचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही, राज्यात उपलब्ध असलेल्या लसींच्या साठ्याचे वास्तविक चित्र सादर करणारे नाही. महाराष्ट्रात कोवॅक्सिन या लसीच्या वापर न झालेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक आहेत. त्याशिवाय आज 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्याचबरोबर लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे.

कोवॅक्सिनचा किती साठा?

याबाबत असं स्पष्ट करण्यात येत आहे की आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार(14 जानेवारी 2022) महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत. त्याबरोबरच आज लसीच्या 6.35 लाख अतिरिक्त मात्रा प्राप्त झाल्या आहेत. कोविनवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या साप्ताहिक वापराच्या आकडेवारीनुसार, 15 ते 17 वयोगटातील लाभार्थींना देण्यासाठी आणि खबरदारीची मात्रा देण्यासाठी महाराष्ट्राचा दैनंदिन सरासरी वापर 2.94 लाख मात्रा आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र लाभार्थींना कोवॅक्सिन या लसीच्या मात्रा देण्यासाठी पुढील दहा दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे

कोविशिल्डचा किती साठा?

त्याशिवाय राज्याकडे कोविशील्ड या लसीच्या वापर न झालेल्या आणि शिल्लक असलेल्या सुमारे 1.24 कोटी मात्रा आहेत. त्यांचा दिवसाला सरासरी 3.57 लाख मात्रांचा वापर विचारात घेतला तर हा साठा लाभार्थींना लसी देण्यासाठी 30 दिवसांपेक्षाही जास्त दिवस पुरेसा ठरू शकतो.