मुंबई : (Reliance) रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. सोबतच आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अर्थात मुकेश अंबानी यांनी नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याचं मोठं पाऊल उचललं. (Mukesh Ambani Nita Ambani)
तिथे आकाश अंबानीनं वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी इतकी मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर व्यवसाय क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा होण्यास सुरुवात झाली. कुटुंबीयांसाठी आणि मुख्य म्हणजे आकाशची आई, नीता अंबानी यांच्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आणि तितकाच भावनिक क्षण.
नीता अंबानी यांचं त्यांच्या तिन्ही मुलांशी खास नातं. आकाश, अनंत आणि ईशा या तिघांवरही त्यांचा विशेष जीव. पण, या मुलांची आई होणं नीता यांच्यासाठी सोपं नव्हतं.
एका मुलाखतीमध्ये त्यांनीच यासंबंधीचा उलगडा केला होता. वयाच्या 23 व्या वर्षी त्या आई होऊ शकत नाही, असं त्यांना डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. तो क्षण नीता अंबानी यांना हादरवणारा होता.
नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. मैत्रीण डॉ. फिरुजा पारिख यांच्या मार्गदर्शनानं नीता यांनी उपचार घेतले आणि पहिल्यांदाच दोन जुळ्या मुलांना त्यांनी जन्म दिला. बऱ्याच अडचणींनंतर नीता गरोदर राहिल्या होत्या. संपूर्ण प्रसूतकाळाआधीच त्यांनी मुलांना जन्म दिला होता.
नीता अंबानी यांची पहिली गर्भधारणा आयवीएफ (IVF) पद्धतीनं करण्यात आली होती. मुलगी ईशा हिनं एका मुलाखतीत आपला आणि आपल्या जुळ्या भावाचा म्हणजेच आकाश अंबानीचा जन्म IVF पद्धतीनं झाल्याचं सांगितलं. (Akash Ambani)
अनंत अंबानीच्या वेळी त्या नैसर्गिक पद्धतीनं गरोदर होत्या. बाळांच्या जन्मानंतर नीता यांनी त्यांचा संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला होता. मुलं काहीशी मोठी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला कामात झोकून दिलं.
आयुष्याच्या एका वळणावर बाळ न होणार असल्याच्या बातमीनं खचलेल्या नीता यांनी वेळीच स्वत:ला सावरलं आणि त्यानंतर मोठ्या सकारात्मकतेनं त्यांनी परिस्थितीचा सामना करत त्यातून वाटही काढली.