मुंबई : उन्हाळा सरला आणि पावसाळा सुरू झाला. पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवे चैतन्य निर्माण होते. वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. हे साथीचे आजार लहान मुलांसाठी आणि प्रामुख्याने गरोदर स्त्रियांसाठी धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीयांसाठी नाजूक असलेल्या या काळामध्ये इंफेक्शन झाल्यास आईसोबतच गर्भावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.
दूषित पाणी, उघड्यावरचे पदार्थ, डास यांच्यामुळे पावसात अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या साथीच्या आजारांपासून बचावण्यासाठी काही एक्सपर्ट टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
गरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी ?
- हात स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. नियमित हात स्वच्छ केल्याने इंफेक्शनचा धोका कमी होतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार, सुमारे ४० ते ५० सेकंद हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. नकळत आपण अनेक अस्वच्छ ठिकाणी स्पर्श करतो. त्यामुळे बॅक्टेरियाचे इंफेक्शन वाढतात.
- गरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्यावर बंधने येतात. अशावेळेस खाण्याची इच्छा नसते. त्यावेळेस नेहमीचं जेवण जेवण्याऐवजी अनेक गरोदर महिला फळांच्या सेवनावर अधिक भर देतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फळं विकत घेताना काळजी घ्या. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.
- कच्च्या भाज्यांचे सलाड आहारात घेताना काळजी घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
- साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा. पावसात भिजून घरी पोहचल्यानंतर पाय नीट स्वच्छ करा. पायांतील बोटांमधील भागही स्वच्छ करा.