Peas Health Benefits : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यास मदत करेल हिरवा वाटाणा

थंडीमध्ये अधिकप्रमाणात हिरवा वाटणा पाहायला मिळतो. तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाणा तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Updated: Nov 20, 2022, 08:40 PM IST
Peas Health Benefits : थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यास मदत करेल हिरवा वाटाणा title=

Green Peas Health Benefits : थंडीच्या दिवसांना सुरुवात झालीये. रात्रीच्या ठिकाणी काही प्रमाणात आता गारवाही जाणवतोय. थंडीमध्ये अधिकप्रमाणात हिरवा वाटणा पाहायला मिळतो. बाजारतही हिरवा वाटाणा प्रत्येक भाजीविक्रेत्याकडे दिसतो. लहान मुलं असूदेत किंवा वृद्ध व्यक्ती हिरवा वाटाणा खाण्यास प्रत्येकाला आवडतो. केवळ त्याची भाजीच नाही, तर पराठे, कबाब तसंच पुलावही तयार करता येतो. याशिवाय तुम्हाला माहितीये का हिरवा वाटाणा तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 

हिरव्या वाटाण्यामध्ये जीवनसत्त्वं, अँटिऑक्सिडंट्स तसंच फायटोन्यूट्रिएंट्स यांसारखे पोषक घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया मटार खाण्याचे नेमके फायदे-

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हिरव्या वाटाण्याचं सेवन करू शकता. कारण वाटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे तुम्हाला दिर्घकाळ भूक लागत नाही. परिणामी तुम्ही कमी खाता आणि वजन कमी होऊ शकतं.

सांधेदुखीपासून आराम

हिरवा वाटाण्याच्या सेवनाने तुम्हाला सांधेदुखीपासून मुक्ती मिळू शकते. वाटाण्यात सेलेनियम नावाचा घटक असतो. सेलेनियम संधिवातापासून मुक्ती देण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

गरोदर महिलांसाठी फायदेशीर

मटारमध्ये कॅल्शियम तसंच फॉलिक एसिड असतं. त्याचप्रमाणे अनेक जीवनसत्त्व आणि पोषक घटकंही हिरव्या वाटाण्यामध्ये असतात. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी हे आवश्यक मानलं जातं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांनी आहारात हिरव्या वाटाण्याचा समावेश केला पाहिजे. 

चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं

हिरव्या वाटाण्यामध्ये नियासिन (Niacin) चं प्रमाण भरपूर असतं. यामुळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.