ऑटो-इम्युन आजार असलेल्या रुग्णांनी कोविड-१९ साथीदरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक

या कसोटीच्या काळात रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी 

Updated: Aug 7, 2020, 06:14 PM IST
ऑटो-इम्युन आजार असलेल्या रुग्णांनी कोविड-१९ साथीदरम्यान अधिक काळजी घेणे आवश्यक title=

मुंबई : जेव्हापासून वैश्विक साथीचे संकट आपल्यावर ओढवले आहे, तेव्हापासून ‘रोगप्रतिकारशक्ती’ हा महत्त्वाचा शब्द झाला आहे. या प्राणघातक विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्याच्या हेतूने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सूचना करण्यामध्ये कोणीच मागे नाही. 

मात्र, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती अतिसक्रिय होऊन तसेच तिच्या कार्यपालनात दोष निर्माण होऊन ती शरीराच्याच उतींवर हल्ला चढवू लागते आणि या अवस्थेला ऑटो-इम्युन आजार म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? जागतिक अंदाजानुसार, सुमारे ७०० दशलक्ष लोक सौम्य आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऑटो-इम्युन अवस्थेने ग्रस्त आहेत.

सोरायसिस, सोरिऍटिक आर्थरायटिस, अँकिलुजिंग स्पॉंडिलिटीस, ऱ्हुमॅटोइड आर्थरायटिस या काही मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ऑटो-इम्युन अवस्था आहेत. यासाठी अनेक रुग्णांना इम्युनो-सप्रेसंट्स (रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे) दिली जातात. मात्र, या औषधांमुळे रुग्णाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. ऑटो-इम्युन आजारांनी ग्रासलेल्या ज्येष्ठ रुग्णांना कोविड-१९ होण्याचा मोठा धोका आहे. मात्र, ऑटो-इम्युन आजारांसाठी घेतली जाणारे औषधे न थांबवण्याचा किंवा त्यात खंड न पडू देण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत, कारण, औषधे न घेतल्यास त्यांचा आजार तीव्र स्वरूप धारण करू शकतो. 

सध्याच्या परिस्थितीमुळे येणारे अतिरिक्त मानसिक ओझे व तणावामुळेही सोरायसिस आणि अँकिलुजिंग स्पॉण्डिलायटिससारख्या ऑटो-इम्युन अवस्थांसह जगणाऱ्या रुग्णांना अचानक त्रास जाणवू शकतो. इंडियन असोसिएशन ऑफ डर्माटोलॉजिस्ट्स, व्हेनेरिओलॉजिस्ट्स अँड लेप्रोलॉजिस्ट्सचे (आयएडीव्हीएल) राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ. किरण गोडसे म्हणाले, “सध्याच्या लॉकडाउनमुळे तसेच वातावरणातील विमनस्कतेमुळे सोरायसिसच्या रुग्णांना तणाव किंवा नैराश्याचा अनुभव येऊ शकतो. यामुळे अवस्थेची तीव्रता अधूनमधून वाढू शकते आणि एकंदर आयुष्याचा दर्जा खालावू शकतो.

या कसोटीच्या काळात रुग्णांनी आजाराच्या व्यवस्थापनाकडे सकारात्मक व सर्वांगीण दृष्टिकोनासह बघावे असा सल्ला आम्ही रुग्णांना देतो. रुग्णांनी तणाव, मद्यपान हे निग्रहाने टाळले पाहिजे आणि त्यांच्यातील लक्षणे तीव्र करणारे निराळे घटक समजून घेतले पाहिजेत. बायोलॉजिक्सचे उपचार सुरू ठेवायचे किंवा सुरू करण्याचा निर्णय डर्माटोलॉजिस्टने त्या-त्या रुग्णाबाबत केला पाहिजे. ऑनलाइन कन्सल्टेशनमुळे रुग्णांना उपचार सुरू ठेवण्यात किंवा डॉक्टरांचा सल्ला पाळण्यात उपयोग होऊ शकते. आता तर भारतीय वैद्यकीय परिषदेनेही टेलीकन्सल्टेशन अधिकृत व कायदेशीर केले आहे.” 

या हालचालींवर निर्बंध घालणाऱ्या कालखंडात आयुष्याचा दर्जा खालावू नये म्हणून डॉक्टरांसोबत नियमितपणे संपर्कात राहण्याच्या गरजेवर अनेक आघाडीच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. आज रुग्ण फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे टेलीकन्सल्ट करू शकतात. सोरायसिस आणि अँकिलुजिंग स्पॉण्डिलायटिससारख्या काही ऑटो-इम्युन आजारांमध्ये इंजक्शन्सच्या माध्यमातून औषधे घेण्यासाठी डॉक्टरांना नियमित भेटणे आवश्यक असते. हे रुग्ण औषधे स्वत:च्या स्वत: घेऊ शकत नाहीत किंवा लॉकडाउन आहे म्हणून उपचार दीर्घकाळ लांबवूही शकत नाहीत. त्यांनी न घाबरता डॉक्टरांना भेटावे, कारण, बहुतेक वैद्यकीय आस्थापनांमध्ये नीट खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांनी मास्क, ग्लव्ह्ज, फेस शिल्ड वापरावे तसेच स्वत:सोबत हॅण्ड सॅनिटायजर ठेवावे. 

इंडियन ऱ्हुमॅटोलॉजी असोसिएशनचे (आयआरए) सदस्य तसेच फोर्टीस हेल्थकेअरमधील कन्सल्टण्ट ऱ्हुमॅटोलॉजीस्ट डॉ. शशांक अकेरकर म्हणाले, “आमच्या क्लिनिकल निरीक्षणानुसार, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या काळात अँकिलुजिंग स्पॉण्डिलायटिस आणि सोरिअॅटिक आर्थरायटिसचे निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापैकी बहुतेकांना जाणवणारी लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हालचालींवर आलेले निर्बंध, ‘वर्क फ्रॉम होम’साठी घरातील खुर्च्यांवर दीर्घकाळ बसून राहणे यामुळे अनेकांमध्ये पाठदुखी खूप वाढली आहे.

यामुळे अनेकांना बऱ्याच काळापासून सतावणाऱ्या पाठदुखीची व सांधेदुखीची प्रकर्षाने जाणीव होत आहे आणि ते ऱ्हुमॅटोलॉजिस्टकडे निदानासाठी धाव घेत आहेत. सध्याच्या काळात हालचालींवर आलेल्या बंधनांमुळे व्हिडिओ कन्सल्टेशन रुग्णांसाठी अधिक सोयीस्कर ठरू शकते. टेली/व्हिडिओ कन्सल्टेशनपूर्वी रुग्णांनी त्यांचे रिपोर्टस् डॉक्टरांना पाठवावे, सर्व प्रश्न तयार ठेवावेत असा सल्ला आम्ही देतो, जेणेकरून अवस्थेच्या प्रगती आणि/किंवा अवनतीबद्दलच्या अत्यावश्यक निरीक्षणांवर उपाय सुचवता येतील. रुग्णांनी साथीचा परिणाम त्यांच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अवस्थेवर होऊ देणे टाळले पाहिजे आणि आयुष्याचा अधिक चांगला दर्जा साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”