मुंबई : पालक अनेकदा आपल्या मुलांसमोर अशा काही गोष्टी करतात, ज्या खरंतर त्यांच्या मुलासाठी चांगल्या नसतात. परंतु अनेक पालकांना या गोष्टी माहिती नसतात. ज्यामुळे ते वारंवार अशा गोष्टी करत असतात. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलाची शिकण्याची शक्ती खूप वेगवान असते. अशा परिस्थितीत मुलं जे काही पाहतात, ऐकतात, ते त्यांच्या मनात घर करून बसतं. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांसमोर वावरताना काळजीपूर्वक वागले पाहिजे.
चला तर मग जाणून घेऊया पालक म्हणून कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे.
एखाद्या गोष्टीवरून वाद होत असतील, तर एकमेकांना शिवीगाळ करू नका. नाहीतर मूल तसंच बोलू लागेल. त्यामुळे अपशब्द वापरू नयेत हे लक्षात ठेवा. मुले सर्व भाषा लवकर शिकतात. त्यामुळे तुम्ही जर मुलांसमोर अपशब्द वापरलेत किंवा आक्रमक वागू लागलात, तर त्यांच्यासाठी हा नेहमीचा विषय होतो आणि ते तसेच वागू लागतात.
मूल लहान असेल तर त्याच्यासमोर दारू पिणे ही तुमची चूक असू शकते. हळूहळू, जेव्हा मुलं मोठी होतात, तेव्हा ते देखील दारु पिणं योग्य समजतात आणि कमी वयात दारु पिऊ लागतात.
जर तुम्ही मुलाला जेवताना फोन वापरण्यास किंवा टीव्ही पाहण्यास मनाई केली असेल, तर ते स्वतःच पाळा. अन्यथा मूलं देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतील. तसेच तो फोनसाठी हट्ट करू लागेल. एवढंच काय तर मुल शांत राहण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना फोन हातात देतात. परंतु तुम्ही ही खूप मोठी चूक करताय. कारण यामुळे मुलांना लहानपणापासून फोनचं व्यसन लागतं.
अनेकदा स्त्रिया जेव्हा एकत्र बसतात तेव्हा त्या शेजाऱ्यांबद्दल तक्रार करू लागतात. काहींना टोमणे मारण्याचीही महिलांची वाईट सवय असते. या सर्व गोष्टी मुलांच्या मनातही घर करतात. त्यांना वाटते की, ही एक चांगली सवय आहे. हे तर सगळेच करतात. ज्यामुळे ते मुल देखील याचा अवलंब करेल. परंतु हे भविष्यासाठी चांगले नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला ही सवय सुधारण्याची गरज आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)