मुंबई : जगभरात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. यावरून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने चिंता व्यक्त केली आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस अधनॉम गेब्रेयसस बुधवारी म्हणाले की, कोविड-19 च्या ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटच्या केसेसची 'त्सुनामी' येण्याची शक्यता आहे. मात्र पुढच्या वर्षभरात जग या महामारीवर मात करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसचं पहिल्यांदा निदान झाल्यानंतर 2 वर्षांनी, UN आरोग्य एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय की, व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या सौम्य लक्षणांमुळे संसर्गाच्या आकडेवारीवरून माहिती घेणं खूप घाईचं ठरेल. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा दिसलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग अमेरिका आणि युरोपच्या काही भागांमध्ये पसरतोय.
WHOचे 194 सदस्य देशांपैकी 92 देश या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या 40 टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी झालेत. महासंचालक टेड्रोस अधनॉम गेब्रेयसस यांनी, जुलैच्या सुरूवातीला देशातील 70 टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नवीन वर्षात संकल्प करण्याचं आवाहन केलंय.
WHOच्या आकडेवारीनुसार, जगभरात गेल्या आठवड्यात समोर आलेल्या कोविडच्या प्रकरणांची संख्या ही अगोदरच्या आठवड्यातील संख्येपेक्षा 11 टक्क्यांनी अधिक होती. युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की, 20 ते 26 डिसेंबर दरम्यान जगभरात सुमारे 49.9 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
WHOच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाची प्रकरणं एकट्या अमेरिकेत 34 टक्के वाढली आहेत. त्यानुसार इथे 11.8 लाखांहून अधिक प्रकरणं सापडली आहेत. आफ्रिकेतील नवीन प्रकरणांमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाल्याने रूग्णांची संख्या सुमारे 2,75,000 वर पोहोचली आहे.