आता औषधांच्या काळाबाजाराला बसणार चाप; केंद्र सरकारकडून मोठा निर्णय

यामुळे नागरिकांना ते खरेदी करत असलेली औषधं बनावट आहेत का नाही याची माहिती मिळू शकणार आहे.

Updated: Jun 5, 2022, 02:07 PM IST
आता औषधांच्या काळाबाजाराला बसणार चाप; केंद्र सरकारकडून मोठा निर्णय title=

मुंबई : औषध नियामक प्राधिकरणाने 300 औषधांची यादी तयार केलीये. ही यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठवली आहे, ज्यामध्ये QR कोड असणार आहे. या नियमामुळे औषधांच्या विक्रीत आणि किमतीत पारदर्शकता येईल आणि त्यांचा काळाबाजार कमी होईल. जेणेकरून नागरिकांना ते खरेदी करत असलेली औषधं बनावट आहेत का नाही याची माहिती मिळू शकणार आहे.

या औषधांमध्ये पेन रिलीफ, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, रक्तदाबासाठी औषधे, साखर आणि गर्भनिरोधक यांचा समावेश आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने डोलो, सॅरिडॉन, फॅबिफ्लू, इकोस्प्रिन, लिम्सी, सुमो, कॅल्पोल, कोरेक्स सिरप आणि अनवॉन्टेड 72 आणि थायरोनॉर्म सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. ही सर्व औषधे खूप पॉप्युलर असून आणि ती ताप, डोकेदुखी, विषाणूजन्य, जीवनसत्वाची कमतरता, खोकला, थायरॉईड आणि गर्भनिरोधकांसाठी दिली जातात. 

मार्केट रिसर्चनुसार, त्यांच्या वर्षभरातील उलाढालीच्या आधारावर या औषधांची निवड करण्यात आली आहे. या औषधांची यादी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे जेणेकरून त्यांना QR कोड अंतर्गत आणण्यासाठी आवश्यक तरतुदी आणि सुधारणा करता येतील.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्चमध्ये फार्मास्युटिकल्स विभागाकडून 300 औषधांची यादी मागवली होती. यामुळे त्यांच्यामध्ये QR टाकण्यासाठी मसुद्यात आणि  नियमांमध्ये आवश्यक ते बदल करता येतील.