JN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध

JN-1: कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 16, 2023, 07:27 AM IST
JN-1: केरळमध्ये सापडला कोरोनाचा नवा उप-प्रकार; जीनोम सीक्वेंसिंगद्वारे तज्ज्ञांनी लावला शोध title=

JN-1: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येतेय. अशातच आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे. नुकतंच अमेरिका, सिंगापूर आणि इंडोनेशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. 

दुसरीकडे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतासाठी सध्या काळजी करण्यासारखे काही नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताबाहेर JN.1 उप प्रकाराने बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र भारतात आतापर्यंत केवळ केरळमध्ये याची प्रकरणं आढळून आलीयेत. त्यामुळे यानंतर केरळमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगवर फोकस केला जातोय. 

देशातील जीनोमिक्स कन्सोर्टियम अर्थात INSACOG चे सह-अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात काळजी करण्यासारखं काही नाहीये. केरळमध्ये ओळखला जाणारा JN.1 उप प्रकार कोरोनाच्या BA.2.86 प्रकारापासून आला आहे. जो आंतरराष्ट्रीय स्तरावर पिरोला या नावाने ओळखला जातोय. 

अमेरिका आणि युरोपमध्ये याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. कारण त्या ठिकाणी संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सहा महिन्यांनंतर एका दिवसात मिळाले 300 पेक्षा अधिक बाधित रूग्ण

तापमानात घट झाल्याने कोरोना संसर्गाच्या दैनंदिन रुग्णांमध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं. गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच एकाच दिवसात 300 हून अधिक कोरोना बाधित आढळून आलेत. यामुळे देशातील एक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येनेही एक हजाराचा टप्पा ओलांडलाय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ३१२ पर्यंत पोहोचली आहे. 

कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढतेय का?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील अनेक देशात इन्फ्लूएंजा व्हायरस पसरला आहे. इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे लोकांमध्ये सर्दी, खोकला आणि हलका ताप अशी लक्षणं दिसून येतायत. अशी लोकं जेव्हा रुग्णालयात तपासणीसाठी जात आहेत, तेव्हा त्यांची कोविड तपासणीही केली जातेय. केरळात कोरोना रुग्ण जास्त सापडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत केरळात वैद्यकीय आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. केरळात फ्लू आणि इन्फ्लूएंजा सारख्या व्हायरसवर तात्काळ तपासणी  केली जातेय.