वर्षाच्या सुरुवातीला सर्वात जास्त 'हार्ट अटॅक', कारणही जाणून घ्या...

ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला हार्ट अटॅकच्या सर्वाधिक घटना घडल्याचं समोर 

Updated: Jan 2, 2020, 01:41 PM IST
वर्षाच्या सुरुवातीला सर्वात जास्त 'हार्ट अटॅक', कारणही जाणून घ्या... title=

मुंबई : नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं. परंतु, यासोबतच नव्या वर्षाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हार्ट अटॅकचे सर्वात जास्त घटना जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडत असल्याचं समोर येतंय. देशातील अनेक प्रसिद्ध डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदयविकाराच्या धक्क्याची सर्वात जास्त प्रकरणं डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात समोर येतात. जगातील अनेक मोठ्या शोधांनुसार आणि आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरतो. 

फोर्टिस एस्कॉर्टस हॉस्पीटलचे संचालक आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशोक सेठ यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हृदयविकाराचं प्रमाण वाढण्याचं कारण थंडी आहे. यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयवर ताण पडतो... रक्तवाहिन्यांमध्ये रक्तांच्या गुठळ्या बनल्यानं हृदयविकाराचा धक्का बसतो.

हार्ट स्पेशालिस्ट डॉ. अपर्णा जसवाल यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीमुळे त्वचा आकुंचन पावते. अशावेळी शरीरातील नसाच्या आकुंचन पावतात आणि हार्मोनल बदलही होतात. त्यामुळेच रक्तातील प्लेटलेटस चिकटतात. अशावेळी ज्यांना हृदयविकाराचा त्रास नाही त्यांनाही त्रास जाणवू लागतो. 

स्वीडनमधील एक संस्थेनं १९९८ पासून २०१३ पर्यंत २.८० लाख रुग्णांवर एक सर्व्हे केला. जवळपास वर्षभराच्या आकड्यांवर नजर टाकली तरी ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला हार्ट अटॅकच्या सर्वाधिक घटना घडल्याचं समोर येतं. हा शोध स्वीडनचा असला तरी तो भारतीयांनाही लागू पडतो. कारण, या महिन्यात राजधानी दिल्लीसहीत देशातील रुग्णालयात हृदयविकाराच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते.

कुणासाठी आहे धोकादायक?

- हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांसाठी

- रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी

- धुम्रपान करणाऱ्यांसाठी

- ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना

हृदयविकाराचा धोका टाळा...

उल्लेखनीय म्हणजे, राजधानी दिल्ली सहीत संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठताना दिसतोय. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या.

- कारणाशिवाय छातीत कळ जाणवली, श्वासोच्छवास घेणं जड झालं तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- थंडीच्या दिवसांत वर्कआऊट करणं फायदेशीर ठरतं. थंडीच्या वातावरणात शरीराचं तपमान वाढवण्यास मदत होते

- परंतु, अशावेळी हेवी वेटलिफ्टिंगसारख्या वर्कआऊटपासून दूर राहा

- मोकळ्या वातावरणात फिरण्याचा सल्ला दिला गेला असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर पडणं केव्हाही चांगलं