Monkeypox Death: भीती होती तेच घडलं; देशात मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सदस्यांसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलीये.

Updated: Aug 1, 2022, 06:21 AM IST
Monkeypox Death: भीती होती तेच घडलं; देशात मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू title=

केरळ : केरळमध्ये यूएईमधून आलेल्या मंकीपॉक्स संशयीत व्यक्तीचा मृत्यू झालाय. यानंतर राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सदस्यांसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलीये. या समितीला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील पुन्नूरमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाला असू शकतो असे राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी सांगितलं. या 22 वर्षीय तरुणाची दुसर्‍या देशात करण्यात आलेली टेस्ट पॉझिटिव्ह आली होती अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान भारतात आतापर्यंत नोंदवलेल्या चार मंकीपॉक्स प्रकरणांपैकी तीन केरळमधील आहेत.

अलाप्पुझामधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडून रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे अहवाल अपेक्षित होता. हा तरुण 22 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीतून केरळमध्ये दाखल झाला होता. भारतात येण्याच्या एक दिवस आधी त्याने टेस्ट केली होती. रिपोर्टनुसार, तो मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आहे अशी माहिती मंत्री जॉर्ज यांनी मीडियाला दिली. 

राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सदस्यांसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलीये. मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याची शक्यता नसल्यामुळे सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

एनआयव्ही रिपोर्टची प्रतीक्षा असताना राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जे लोक मृत व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात होते त्यांना स्वतःला विलगीकरणात ठेवण्यास सांगितलं आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर इन्यूबेशन कालावधी सुमारे 21 दिवसांचा असतो. 

पुन्नूरमधील पंचायत अधिकाऱ्यांनीही सोमवारी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विषाणूजन्य तापाव्यतिरिक्त रुग्णाला मंकीपॉक्स किंवा इतर कोणत्याही आजाराची किंवा आरोग्य समस्यांची कोणतीही लक्षणं नव्हती.