Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण

Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार

Updated: Jan 31, 2023, 05:01 PM IST
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण title=

Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट (Wallet) ठेवणं ही पुरुषांसाठी सामान्य गोष्ट आहे. त्या पर्समध्ये पैशांशिवाय अनेकप्रकारचे कार्डस असतात. 99 टक्के पुरुषांना ही सवय आहे. पण तुम्हाला माहित आहे का ही सामान्य वाटणारी सवयदेखील गंभीर आजाराचं कारण बनू शकते. यामुळे तुमचं चालणं, फिरण इतकंच करच उठणं बसणंही त्रासदायक ठरु शकते. (wallets in back pocket could be serious)

धक्कादायक प्रकरण समोर
हैदराबादमधल्या एका 30 वर्षांच्या व्यक्तीला एका आजाराने ग्रासलं. सुरुवातीला त्याने छोटं-मोठं दुखणं असल्याचं समजून दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस दुखण्यात वाढ होऊ लागली आणि तसा त्रासही वाढत गेला, उजव्या नितंबापासून पाय आणि बोटांपर्यंत तीव्र वेदना होऊ लागल्या.  औषधं आणि उपचारानंतरही त्या व्यक्तीचं दुखणं कमी होत नव्हतं. तपासानंतर त्या व्यक्तीला 'फॅट वॉलेट सिंड्रोम' (Fat Wallet Syndrome) असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. 

'फॅट वॉलेट सिंड्रोम' म्हणजे काय?
फॅट वॉलेट सिंड्रोम झालेल्या व्यक्तीला चालण्याच्या तुलनेत बसल्यानंतर किंवा झोपल्यानंतर तीव्र वेदना होतात. त्या व्यक्तीच्या एमआरआयसह  (MRI) अनेक चाचण्या झाल्या, ज्यामध्ये त्याला पाठीच्या कण्यातील किंवा पाठीच्या खालच्या भागात नसा दबल्या गेल्याची कोणतीही तक्रार नव्हती. त्यानंतर या व्यक्तीची नर्व कंडक्शन (मज्जातंतूची चाचणी) करण्यात आली. या तपासणीत त्या व्यक्तीच्या उजव्या सायटॅटिक नर्व्हला गंभीर इजा झाल्याचं डॉक्टरांना आढळलं. सुरुवातीला सायटॅटिक नर्व्हचं (Sciatic Nerve) नुकसान कशामुळे झाले हे कळू शकलं नाही.

डॉक्टरांनी त्या व्यक्तीला एखादा अपघात झाला होता का याची चौकशी केली, पण असा कोणताही अपघात त्या व्यक्तीबरोबर झाला नव्हता. पण तो व्यक्ती नेहमी आपल्या पँटच्या मागच्या खिशात पैशाचं पाकिट ठेवत होता. त्याच स्थितीत तो जवळपास नऊ ते दहा तास ऑफिसमध्ये बसत होता. त्यानंतर डॉक्टरांना आजाराचं खरं कारण कळलं. जाड पाकिटामुळे त्या व्यक्तीचे स्नायू दबले गेले होते. ज्यामुळे पाठीच्या कण्यापासून पायाकडे जाणाऱ्या मज्जातंतूवरही दबाव येत होता. फॅट वॉलेट सिंड्रोममुळे सायटॅटिक मज्जातंतूवर दबाव येऊन रुग्णाला तीव्र वेदना होऊ शकतात. 

जड पाकिटामुळे समस्या
पुरुष नेहमी आपल्या पाकिटात पैशांशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसंच महत्त्वाची कागदपत्र ठेवतात. ज्यामुळे पर्स अधिक जड होते. जड पाकिटामुळे फॅट वॉलेट सिंड्रोम होण्याची शक्यता जास्त असते. हा सायटॅटिक नर्वशी संबंधित विकार आहे. सायटिका म्हणजे मज्जातंतू जो मणक्यातून नितंब आणि पायांच्या टाचेपर्यंच जातो. त्यामुळे नितंबापासून पायापर्यंतचा भाग दुखू शकतो. सायटिका नस दबली गेल्यामुळे अनेकवेळा अंगाला सूजही येऊ शकते.

ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी पँटच्या मागच्या खिशात जड पाकिट ठेवून बराच वेळ काम करणाऱ्या लोकांमध्ये फॅट वॉलेट सिंड्रोम सारखी समस्या उद्भवू शकते. काहीवेळा लांब पल्ल्याचा प्रवास करणारे कार आणि ट्रक चालकही त्यांचं पाकीट मागच्या खिशात ठेवतात, ज्यामुळे त्यांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवणं ही तशी सामान्य गोष्ट आहे, पण यामुळेच असामान्य आजाराला तुम्ही बळी पडू शकता.