मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी जे.जे. रूगणालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार शुक्रवारी इंद्राणी भायखळ्याच्या जेलमध्ये बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला जेजे हॉस्पिटल्समध्ये आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. मात्र हे सगळं नेमकं घडलं कसं हा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे.
जेजे हॉस्पिटल्सचे डीन डॉ. सुधीर यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी मुखर्जीने आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात औषधं घेतली होती. इंद्राणी नैराश्यावर मात करण्यासाठी औषधं घेत आहे.
इंद्राणीने कोणती औषधी घेतली याबाबत विचारणा केल्याचेही त्यांनी मीडियाला सांगितले. मात्र औषधांच्या मात्रांची चौकशी ही पोलिस तपासाचा एक भाग आहे.
इंद्राणी मुखर्जीला वेळोवेळी औषधं देण्याचं काम हे तुरूंगवासातील सुरक्षारक्षकांचं काम आहे. इंद्राणी मुखर्जीकडे औषधं ठेवण्याची परवानगी नाही तसेच जेल प्रशासनाचे डॉक्टर संबंधित औषधं देत नाहीत. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये इंद्राणी मुखर्जीना औषधांचा ओव्हरडोस झाला ? हे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे येईल.
२४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. तसेच याशिवाय तिघांवर तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे, असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आलाय.