मुंबई : बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचं आहे. आईचं दूध मुलांच्या आरोग्यासाठी अमृत मानलं जातं. दरम्यान आईच्या दुधाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. तर बाळाला किती काळ स्तनपान दिलं पाहिजे याबाबत अनेक शंका असतात.
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने जाणून घेऊया नवजात बाळाला किती काळ स्तनपान दिलं गेलं पाहिजे.
काही स्त्रिया आपल्या बाळाला खूप कमी वेळ स्तनपान देतात आणि काही स्त्रिया खूप जास्त काळ स्तनपान देतात. हा गोंधळ दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने बाळाला स्तनपान देण्याचा कालावधी निश्चित केला आहे.
जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, पहिलं स्तनपान बाळाच्या जन्मानंतर 1 तासाच्या आत केलं पाहिजे. कारण आईच्या पहिल्या दुधात मुलाच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक अनेक गुणधर्म आणि घटक असतात. त्याच वेळी, बाळाला फक्त 6 महिने स्तनपान दिलं पाहिजे. या काळात बाळाला पाणी देऊ नये.
दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉर्म्युला मिल्क दिलं जाऊ शकतं. त्याच वेळी, 6 महिन्यांनंतर, डब्ल्यूएचओ बाळाला स्तनपान करवण्याबरोबरच काही पचण्यायोग्य सॉलिड पदार्थ देणं सुरू करण्याचा सल्ला देतं. 2 वर्षापर्यंत बाळाला आईच्या दुधापासून वेगळं करू नये. यापेक्षा कमी स्तनपान बाळाच्या विकासात अडथळा आणतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, 6 महिने, बाळाला जेवढी भूक लागते तितक्या वेळा स्तनपान करा. याचा अर्थ असा होतो की, जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा दिवसा किंवा रात्री त्याला आईचं दूध द्यावं. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये.