मुंबई : देशात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसतेय. दरम्यान अशा परिस्थितीत काही कुटुंबांमध्ये असंही चित्र आहे की, एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे, तसंच इतर घरातील लोकांमध्ये कोरोनाची लक्षणंही आहेत, परंतु कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. असं का होतंय? जाणून घेऊया यामागील नेमकं कारण.
यावर एका वेबसाईटशी बोलताना इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटरचे डॉ. विजय दत्ता म्हणाले, कुटुंबातील काही सदस्य आरटीपीसीआर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दिसून येतं. तर इतर व्यक्तींना लक्षणं असूनही टेस्ट मात्र निगेटीव्ह येते. यामागील कारणांपैकी एक कारण नमुना गोळा करण्यात चूक असू शकते.
व्हीपी मायक्रोबायोलॉजिस्ट जेनेस्ट्रिंग डायग्नोस्टिकच्या डॉ अल्पना रझदान एका वेबसाईटशी बोलताना म्हणाल्या, जर स्वॅब योग्य प्रकारे घेतला नाही किंवा स्वॅब चाचणी दरम्यान घेतलेल्या नमुन्यात व्हायरसचे पार्टिकल्स नसतील तर टेस्ट निगेटीव्ह येते.
कोरोनाच्या बाबतीत इन्क्युबेशन फार महत्त्वाचं आहे. व्हायरसचं इन्क्युबेशन म्हणजे, जेव्हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला विकसित होण्यास थोडा वेळ लागतो. डॉ. विजय दत्ता यांच्या मते, कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येण्याचं दुसरे कारण म्हणजे जेव्हा व्हायरस इन्क्युबेशनच्या अवस्थेत असतो किंवा तो शरीरात विकसित होऊ शकत नाही अशा वेळी तुम्ही RTPCR केली असता ती निगेटीव्ह येऊ शकते.
कोचीच्या कोविड टास्क फोर्स क्लिनिकल रिसर्चर डॉ. राजीव यांच्या मते, "ओमायक्रॉनच्या बाबतीत, व्हायरसची लक्षणं दिसण्यासाठी 3 ते 6 दिवसांचा कालावधी लागतो. लक्षणांच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोरोनाचा चाचणी केल्यास अहवाल निगेटिव्ह येईल."
काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, इन्क्युबेशनला काहीवेळा जास्त वेळ लागू शकतो. डॉ. राझदान यांच्या मते, इन्क्युबेशनचा सरासरी वेळ 4-6 दिवस असतो. या दरम्यान व्हायरस शरीरात विकसित होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर 6 दिवसांचा कालावधी चाचणीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, याआधीही अनेकजण पॉझिटिव्ह येतात.