मुंबई: काहीच दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आपली दमदार हजेरी लावेल. कडाक्याच्या उन्हातून सुटका देणार्या पावसाच्या सरी अल्हाददायक वाटतं असल्यातरी, ऋतूमानात होणार्या या बदलाचा शरीरावरही परिणाम दिसून येतो. मग सर्दी – खोकला हे अगदीच सामान्य आहे. अशावेळी औषधं – गोळ्या खाण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील ‘आलं आणि मध’ हा घरगुती उपाय नक्की करून पहा. ‘आलं व मधामुळे’ सायनसची समस्या तर कमी होतेच पण त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासदेखील मदत होते.
आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असल्याने, सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत होते. तर मधातील अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म सायनसचा त्रास कमी करण्यास मदत करतात. तसेच मधामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सायनसमुळे नाक चोंदणे व डोकेदुखीची समस्या सतावत असेल तर आलं व मध घातलेला काढा प्यावा. तर श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अस्वस्थ वाटत असेल तर आल्याच्या तुकड्यासोबत चमाचाभर मध घ्यावे.
मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा, 4-5 तुळशीची पानं ग्लासभर पाण्यात उकळावीत.
हा काढा उकळून निम्मा झाल्यानंतर गॅस बंद करावा
त्यानंतर मधाचे काही थेंब मिसळून रोज सकाळी प्यावे.
सुंठाची पावडर व मध यांचे मिश्रण करून त्याच्या लहान लहान गोळ्या बनवाव्यात. या गोळ्या सकाळ –संध्याकाळ चघळल्याने सायनसचा त्रास कमी होण्यास मदत होते.
टीप – हा केवळ घरगुती उपाय आहे. त्यामुळे वैद्यकीय औषधांच्याऐवजी या उपायाचा वापर करू नये.