मुंबई : खाण्या पिण्याच्या विचित्र सवयी, अवेळी झोप आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो. पचनसंस्थेमध्ये बिघाड झाल्यानंतर पित्ताचा त्रास होतो. अशावेळेस पोट जड वाटणं, सुस्ती येणं, भूक मंदावणं, उलट्या होणं, मळमळणं, छातीत भरून आल्यासारखं वाटणं, पोटात गॅस होणं अशी लक्षण आढळतात.
पित्ताचा त्रास उन्हाळ्यात अधिक वाढण्याची शक्यता असते. अनेकदा अॅन्टासिड घेऊन पित्ताचा त्रास कमी केला जातो मात्र या वारंवार अॅन्टासिड घेणं आरोग्याला त्रासदायक असते. म्हणूनच काही घरगुती उपायांनी पित्त कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता.
कोमट पाण्यामध्ये काळामिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळा. या पाण्याच्या मिश्रणाने दिवसाची सुरूवात करणं आरोग्याला फायदेशीर ठरते.
आवळा, गुलाब आणी बडीशेप यांचे एकत्र मिश्रण बनवा. सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा हे मिश्रण घेतल्याने तुम्हांला आराम मिळू शकतो.
पाण्यामध्ये बडीशेपाचे काही दाणे मिसळून पाणी उकळा. मिश्रण निम्मे झाल्यानंतर ते थंड करा. या अर्कामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्णदेखील फायदेशीर ठरते. कोमट पाण्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिसळून प्यायल्याने फायदा होतो.
मनुक्याचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी दूधात भिजवलेल्या मनुका मिसळून उकळा. दूध थोडे थंड झाल्यानंतर प्यावे. भिजवलेल्या मनुक्यांनी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सोबतच सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय असल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
जायफळ आणि सुंठाचे मिश्रण बनवा. कोमट पाण्यात ही पावडर मिसळा. पित्ताचा त्रास असल्यास जायफळ सुंठाच्या पावडरचे मिश्रण खाल्ल्यानेही पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
मूळा कापून त्यावर काळं मीठ, मिरपूड लावून खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
तुम्हांला सतत पित्ताचा त्रास असल्यास जेवणानंतर 2-3 लवंगा चघळा. हळूहळू चघळताना त्यामधील रस गिळल्यास पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पित्तामुळे पोटात गॅस झाल्यास जेवणानंतर नारळपाणी प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
रात्री पाण्यात काकडी, लिंबू, पुदीना यांची पानं मिसळा. सकाळी या पाण्याने दिवसाची सुरूवात करा. जेवल्यानंतर हे पाणी प्यायल्यानेही पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
कोमट पाण्यामध्ये काळं मीठ, हिंग, ओवा मिसळून प्यायल्याने पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.