मुंबई : वजन वाढणं ही जशी सर्वसामान्य समस्या, तक्रार आहे. त्याचप्रमाणे वजन न वाढणं, वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन न वाढल्याने त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा, अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो. त्यामुळे अनेक जण वजन न वाढल्यानेही त्रस्त आहेत. काही लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचा वापर करतात मात्र सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक आहे. त्याचे साइड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. परंतु काही घरगुती, आयुर्वेदीक उपाय अशा समस्येवर अत्यंत गुणकारी ठरतात.
दिवसाची सुरुवात अगदी हलक्या व्यायामाने करा. योगा करा. त्यामुळे भूक वाढते. सकाळी नाश्तामध्ये दूध, तूपाचा अधिक वापर करा. जेवणात डाळी, मासे, अंडी, चिकन यांचा समावेश करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यानेही वजन वाढत नाही. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन अशा समस्या असल्यासही वजन वाढण्यास अडथळा येतो. त्यामुळे काही त्रास होत असल्यास त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळेही शरीर कमजोर होते आणि वजन वाढत नाही. कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य, कमी झोप यामुळेही वजन वाढत नाही. वजन न वाढण्यामागे आनुवंशिकता हेदेखील कारण आहे.
मनुका रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खावा. सतत दोन-तीन महिने हा प्रयोग केल्याने बदल जाणवेल. मनुका फॅट्सला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलण्याचे काम करतो. मनुकासोबत अक्रोड आणि बदामाचं सेवनही फायदेशीर ठरते.
केळं हा संपूर्ण आहार मानला जातो. दररोज दोन ते चार केळी खाल्याने लवकरच फरक जाणवतो. केळ्यात असणारे कॅलरीज, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम हे उर्जा स्रोत शरीराला एनर्जी देण्यासह वजन वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.
भरपूर झोप घ्या. दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतल्याने वजन वाढण्यास मदत होते. शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम दिसतो. त्यामुळे पुरेशी झोप गरजेची आहे.
वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदातील सर्वोत्तम पर्याय आहे. एक ग्लास दूधात २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पियाल्याने फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे.
काही दिवस रोज जेवण मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळाचं तेल दुबळेपणा दूर करुन वजन वाढवण्यास मदत करते.
काळे चणे वजन वाढवण्यास मदत करतात. काळ्या चण्यांमध्ये प्रोटीन्स असतात. रोज रात्री थोडे काळे चणे भिजवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. काळ्या चण्यासोबत खजूर खाल्ल्यानेही फायदा होतो. दूधात खजूर उकळून ते दूध पियाल्यानेही फायदा होतो. यामुळे काही दिवसांत वजन वाढण्यास मदत होईल.
वजन वाढवण्यासाठी बटाट्याचा जेवणात वापर करा. बटाटामध्ये कार्बोहाइड्रेट्स, कॉम्प्लेक्स शुगर असते. जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. शक्यतो तळलेला बटाटा खाणे टाळा.