मुंबई : सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाळ्यात स्वत:ला फिट ठेवणे आणि आपल्या चेहऱ्याची खास काळजी राखणे गरजेचे असते. सोयाबीन केवळ तुमचे आरोग्य चांगले राखणार नाही तर त्वचेचीही काळजी घेईल.
सोयाबीनच्या नियमित सेवनाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. सोयाबीनच्या सेवनाने शरीरात अॅस्ट्रोजन निर्माण होते जे सुरकुत्या दूर कऱण्यास मदत करते. केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात. उन्हाळ्यात तेलकट त्वचेमुळे पिंपल्सना निमंत्रण मिळते. तुम्हालाही ही समस्या आहे तर सोयाबीनचा खाण्यात समावेश करा.
सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची समस्याही दूर होते. सोयाबीन खाल्ल्याने नखांना मजबूती मिळते तसेच नखे चमकदार होतात. सोयाबीनची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी सोयाबीन पाण्यात भिजवा. त्यानंतर याचे बारीक मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.