मुंबई : पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो.
कफाचा त्रास कमी करण्यासही आलं तितकेच फायदेशीर ठरते हे तुम्हांला ठाऊका आहे का ? सर्दी-पडशाच्या त्रासावर आल्याचा तुकडा चघळणे हा आजीबाईच्या बटव्यातील एक उपाय आहे. त्यामुळे पुढच्यावेळेस तुम्हांला अॅलर्जिक रिअॅक्शनने खोकल्याचा त्रास वाढल्यास कडवट औषध-गोळ्या घेण्याआधी हा घरगुती उपाय नक्की करून पाहा.
आल्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होण्यास मदत होते. तसेच सतत आलं चघळल्याने शुष्क कफामुळे होणारा त्रास नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामधील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील टॉक्सिक ( घातक घटक) बाहेर पडण्यास मदत होते. तसेच आल्यामधील gingerols हे घटक दाहशामक असल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. आल्यामुळे श्वसनमार्गातील अॅलर्जिक रिअॅक्शन रोखण्यास मदत होते. यामुळे अस्थमा, ब्रोन्कायटीसचा त्रास कमी होतो. तसेच आल्यासोबत मीठ खाल्ल्याने हे मिश्रण अधिक प्रभावी आणि औषधी होण्यास मदत होते. मीठामुळे घशात बॅक्टेरियांची होणारी वाढ रोखण्यास मदत होते.
कफाचा त्रास कमी करण्यासाठी आलं-मीठ एकत्र चघळणं हा अत्यंत सोपा घरगुती उपाय आहे. मात्र हा उपाय सार्यांनाच आवडेल असे नाही. म्हणूनच त्याऐवजी आल्याचा रसदेखील पिऊ शकता.
आलं आणि मीठ : आल्याचा लहानसा तुकडा सोलून त्यावर थोडे मीठ पसरवा. हळूहळू आल्याचा तुकडा चघळा. त्याचा रस गिळा. आलं चवीला तिखट आणि उग्र असते. आलं खूपच तिखट लागत असल्यास तुम्ही थोडेसे मध चाखू शकता.
आल्याचा काढा : सर्दी-पडशाचा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा काढा हादेखील फायदेशीर पर्याय आहे. याकरिता ग्लासभर पाण्यात आल्याचे तुकडे आणि चिमुटभर मीठ टाकून मिश्रण उकळा. त्यानंतर हे मिश्रण निम्मे झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार काढा गाळून गरम गरम प्यावा.