मुंबई : हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो. झोप पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रास जाणवतो. पण आपण याकडे तितकेसे लक्ष देत नाही. वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
पित्ताचा त्रास होत असेल तर घरगुती उपायाने तो बराही करता येतो. त्यासाठी हे आहेत काही घरगुती उपाय
केळी : केळ्यातून शरीराला पोटॅशियम मिळते. त्यामुळे पोटात अॅसिडची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबरमुळेही पचनक्रिया सुलभ होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खावे. याने पित्ताचा त्रास कमी होतो.
तुळस - तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. ज्यामुळे पोटातील अॅसिडपासून तयार होणारे विषारी घटकांपासून बचाव होतो. पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.
दूध - दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
बडिशेप - बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
जिरे - जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय जिरे पाण्यात उकळून ते पाणी थंड करुन प्यायल्यानेही फायदा होतो.