ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधं कमी प्रभावी?; काय आहे सत्य जाणून घ्या

औषधं ही बरंच संशोधनानंतर एका केमिकलच्या आधारे बनवली जातात.

Updated: Mar 17, 2022, 02:59 PM IST
ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधं कमी प्रभावी?; काय आहे सत्य जाणून घ्या title=

मुंबई : आजच्या घडीला जवळपास प्रत्येकाच्या घरात औषधांचा वापर केला जातो. औषधं ही व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. औषधं ही बरंच संशोधनानंतर एका केमिकलच्या आधारे बनवली जातात. तुम्ही जेनेरिक औषधांबद्दल यापूर्वी ऐकलं असेल. जेनेरिक औषधं ही ब्रँडेड औषधांसारखीच असतात आणि त्यांचं उत्पादन, गुणवत्ता आणि रोगावर जवळपास समान परिणाम होतो. 

जेनेरिक औषधांचं नावही जवळपास सर्वत्र सारखेच आहे. आपल्या देशात सरकारकडून जेनेरिक औषधांच्या खरेदी-विक्रीवर अनेक योजना राबवल्या जातात. तर आज जाणून घेऊया जेनेरिक औषधे काय आहेत? 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ही औषधं बनवण्याचा एक फॉर्म्यूला आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारची रसायनं एकत्र करून गोळी किंवा कॅप्सूल बनवली जाते. औषधं बनवण्यासाठी वापरले जाणारे क्षार आणि मॉलिक्यूल जगभरातील जवळजवळ सर्व ब्रँडच्या औषधांमध्ये सारखेच असतात. जेनेरिक औषधांचा दर्जा आणि ब्रँडेड औषधांचा दर्जा यामध्ये कोणताही फरक नसतो. ब्रँडेड कंपन्यांचे पेटंट संपल्यानंतर जेनेरिक औषधं तयार केली जातात.

जेनेरिक औषधं पेटंट औषधांपेक्षा कमी प्रभावी असतात?

जेनेरिक औषधांबाबत लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, ही औषधे पेटंट किंवा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी परिणामकारक आहेत का? याचं उत्तर नाही असं आहे. एकाच औषधाचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत जेनेरिक औषधांचा प्रभाव पेटंट औषधांपेक्षा कमी परिणाम होतो, असं म्हणणे चुकीचं ठरेल. 

जेनेरिक औषधं कोणत्याही पेटंटशिवाय तयार केली जाऊ शकतात. त्याचं फॉर्म्युलेशन पेटंट केले जाऊ शकतं. पण, औषधं बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचं पेटंट नाही. याशिवाय जेनेरिक औषधे बनवताना आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन केलं जातं. त्यामुळे या औषधांचा दर्जा आणि त्यांचा रोगांवर होणारा परिणामंही सारखाच आहे. त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांचा डोस ब्रँडेड औषधांसारखाच असतो.

का स्वस्त मिळतात जेनेरिक औषधं?

जेनेरिक औषधे स्वस्त आहेत असा भ्रम अनेकदा होतो. त्यामुळे ती पेटंट केलेल्या औषधां इतकी प्रभावी नसतील, असं अनेकांना वाटतं. जेनेरिक औषधांच्या किमती निश्चित करण्यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन केली जाते. त्यामुळे त्यांच्या किंमती मनमानी ठेवू शकत नाहीत.