ठाण्यातील पहिले स्वतंत्र कर्करोग उपचार केंद्र सुरू

  भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 5, 2018, 06:01 PM IST
ठाण्यातील पहिले स्वतंत्र कर्करोग उपचार केंद्र सुरू title=

मुंबई :  भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

यापैकी ७०% रुग्ण पुढील टप्प्यावरील आहेत. परिणामी कर्करोगमुक्त रुग्णांचे प्रमाण कमी असून कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भारतातील ६% मृत्यू कर्करोगामुळे होतात. कर्करोगामुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचा विचार करता हे प्रमाण ८% आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयएमसीआर) आकडेवारीनुसार पुरुषांमध्ये तोंडाचा, घशाचा, अन्ननलिका, पोट, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते तर महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवा, स्तन, तोंड, अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते.

स्थानिक पातळीवर कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आशीष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रीतम काळसकर, डॉ. क्षितिज जोशी, डॉ. प्रदीप केंद्रे यांनी घाटकोपर, बोरिवली, विलेपार्ले आणि ठाणे येथे मुंबई ऑन्कोलॉजिकल सेंटर सुरू केले. या ऑन्को उपचार केंद्रांत तज्ज्ञ आणि प्रशिक्षिक नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली बाह्यरुग्ण आरोग्य सेवा, केमोथेरपी, सहाय्यक औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येतात. या केंद्रांमध्ये केमोथेरपी अॅडमिनिस्ट्रेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन, चाचण्यांशी संबंधित कामे, हेमेटॉलॉजिकल उपचार, बोन मॅरो अॅस्पिरेशन आणि बायोप्सी, तसेच इतर सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

मुंबईतील मुंबई ऑन्कोकेअर सेंटरमधील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वशिष्ठ मणियार म्हणाले, "नियमित केमेथेरपीच्या सत्रांसाठी रुग्णाला दर तीन महिन्यांनी सहा ते आठ तास वेळ द्यावा लागतो. केमोथेरपीच्या प्रत्येक सत्रासाठी रुग्णाला हॉस्पिटलमध्ये खेप घालावी लागते. त्यामुळे कर्करुग्णांना उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ऑन्कोलॉजिकल सेंटरची अधिकाधिक स्वतंत्र वैद्यकीय केंद्रे उभारण्याची योजना आहे. जेणेकरून कर्करुग्णांना त्यांच्या घराजवळच वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल."

ठाण्यातील मुंबई ऑन्कोलॉजिकल सेंटरमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रीतम काळसकर म्हणाले, "कर्करुग्णांना आणि कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांना अनेक वर्षे तपासणीसाठी उपचार घेण्यासाठी वैद्यकीय केंद्रात जावे लागते. ७०% रुग्णांना केमोथेरपीची आवश्यकता असते. ४०-४५% रुग्णांना रेडिशनची आवश्यकता असते तर ७०% कर्करुग्णांना इम्युनोथेरपीसारख्या अॅड-ऑन थेरपीची गरज असते. हॉस्पिटलच्या बाहेर कर्करुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या तर या कर्करुग्णांचे हॉस्पिटलमधील इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करता येईल. कर्करोगावर उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या केंद्रांमुळे कर्करोग उपचार नियंत्रित आणि सुरक्षित वातावरणात पुरवता येतील.", अशी पुष्टी डॉ. काळसकर यांनी जोडली