मुंबई : आजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं. WHO ने दिलेल्या अहवालानुसार, 137 देशांमधील अहवालानुसार, जगभरातील केवळ 14 देशांमध्ये गरजेनुसार योग्य स्वरूपात सिजेरियन पद्धतीने बाळाला जन्म दिला जातो. सिझेरियन पद्धतीबाबत लोकांच्या मनात अनेक समज - गैर समज आहेत. अशाच काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या.
WHO ने नमूद केलेल्या 14 देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सिझेरियन पद्धातीने बाळाला जन्म देण्यासाठी दबाव टाकला जातो. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, बाळ किंवा आईच्या जीवाला धोका असल्यास सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला जातो.
जगात असे अनेक देश आहेत जेथे आईची दुसरी प्रसुती ही सिझेरियन पद्धतीने केली जाते. ब्राझिल, टर्की, इजिप्त या देशांमध्ये केवळ 50% महिलांची प्रसुती ही सिझेरियन पद्धतीने केली जाते.
भारतात सिझेरियनबाबत फार वाईट अवस्था नाही. भारतात सुमारे 18% महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीने होते. मात्र भारतातील काही प्रमुख राज्यात, मेट्रो सिटीमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचे प्रमाण अधिक आहे. मुंबई, दिल्ली अशा शहरांमध्ये वास्तव धक्कादायक आहे.
दिल्लीतील खाजगी रूग्णालयात 65% मुलांचा जन्म सिझेरियन पद्धतीद्वारा होतो. काही महिला त्यांच्या मर्जीने असे करतात तर काहीवेळेस डॉक्टर रूग्णांवर दबाव टाकतात.
भारतासारख्या देशात आरोग्यव्यवस्थेला 'व्यवसाय' म्हणून पाहिले जाते. नैसर्गिक प्रसुती झाल्यास बाळ आणि आई कमीत कमी वेळ रुग्णालयात राहतात तर या उलट सिझेरियनमध्ये आई आणि बाळाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागत असल्याने हॉस्पिटलला, डॉक्टरांना आर्थिक फायदा होतो.
एकदा सिझेरियन झाल्यास पुढील प्रसुतीच्या वेळेसदेखील सिझेरियन करावे लागते असा अनेकांचा समज आहे. मात्र एका प्रसुतीनंतर सामान्यपणे 2 वर्षात स्त्रियांचे शरीर पुन्हा सामान्य होते. मात्र केवळ 'आर्थिक' फायदा पाहण्यासाठी अनेकदा डॉक्टर स्त्रियांपासून ही गोष्ट लपवून ठेवतात.
डॉक्टर आणि एक्सपर्टचा सल्ला पाहता सिझेरियन प्रसुती हा एक मोठा धोका असतो. स्त्रीच्या शरीरातून बाळाला काढण्यासाठी चिरफाड करावी लागते. शस्त्रक्रियेचा हा प्रकार आईसाठी वेदनादायी असतो. सिझेरियननंतर आई आणि बाळाला पुन्हा सामान्य स्वरूपात येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो.