Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

लस घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय.

Updated: Jan 16, 2022, 03:02 PM IST
Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा title=

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत एका मुलींचा कोरोनाची लस घेऊ मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या दाव्यानुसार मुंबईतील तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लस घेतल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलंय. मात्र मुंबई महापालिकेने हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लसीचा डोस घेतल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मात्र यावर बीएमसीने स्पष्टीकरण देत मुलीचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुलीच्या मृत्यूबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, घाटकोपरमध्ये लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली तेव्हा बीएमसीने तिच्या कुटुंबीयांशी बोलून माहिती घेतली. त्यावेळी समजलं की मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तसंच हा अटॅक लसीमुळे आला की नाही याची माहिती शवविच्छेदनातून कळेल, पण त्यासाठी कुटुंबीय तयार नाहीत."

मृत्यू झालेली ही मुलगी मुंबईतील घाटकोपर भागात राहते. 8 जानेवारीला मुलीने राजावाडी रुग्णालयात लस घेतली होती आणि 11 जानेवारीला तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिचा मृत्यू लसीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला होता.

बीएमसीने ट्विट करून, आर्यचा मृत्यू  झाल्याचं सांगितलय. हृदयविकाराच्या झटक्याने हा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.