Late Marriage Side Effects: आपल्या आजूबाजूला अनेक जोडपी वंध्यत्वाशी झुंज देत असल्याचे पहायला मिळते. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे उशीराने होणारा विवाह. आता ते दिवस गेले जेव्हा पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या विशीच्या सुरुवातीच्या किंवा तिशीच्या आत लग्न करायचे. मेट्रो सिटीचा विचार केला तर, बहुतेक लोक करिअरमुळे उशीरा लग्न करतात. शिक्षण आणि करिअरमुळे तिशीनंतर लग्न करण्यास तरुणांची पसंती पहायला मिळत आहे. यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आता पुरुष आणि महिलांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. उशीराने झालेल्या विवाहामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.
मुंबईतील प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वर्णा गोयल म्हणाल्या की, उशिरा विवाह केल्यामुळे 10% पेक्षा जास्त जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, केवळ मद्यपान, लठ्ठपणा, एंडोमेट्रिओसिस, लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) किंवा वयच नाही तर उशीराने होणारा विवाह देखील प्रजननक्षमतेला हानी पोहोचवतो. हे ज्ञात सत्य आहे की वंध्यत्व म्हणजे गर्भवधारणा होण्यास अडचणी येणे.
उशीराने होणारा विवाह आणि वंध्यत्व: स्त्रियांच्या वयानुसार, त्यांची गर्भधारणा आणि गर्भधारणेची शक्यता खूपच कमी होते. लैंगिक संभोग कमी होणे,गर्भाशयासंबंधी समस्या, स्त्रीबीजांची संख्या कमी होणे आणि गुणवत्ता खराब होणे यामुळे हे घडते. 35 ते 38 वर्षांनी प्रजनन क्षमता कमी होते. महिलांना 24-35 वर्षांच्या दरम्यान गर्भधारणेचा सल्ला दिला जातो. पस्तीशी ओलांडल्यानंतर महिलांना गर्भधारणेसाठी विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.
डॉ. स्वर्णा गोयल म्हणाल्या की, अनेक स्त्रिया भविष्यात उशीराने मूल होण्यासाठी पर्याय म्हणून एग फ्रीझिंग आणि सरोगसीची निवड करत आहेत. प्रजनन क्षमता कमी होणे ही केवळ स्त्रीयांचीच नव्हे तर पुरुषाचीही समस्या आहे. वयानुसार पुरुषांची प्रजनन क्षमता देखील हळूहळू कमी होते आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते आणि गर्भधारणेत अडथळा निर्माण करु शकते. इतर संभाव्य कारणांमध्ये धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, विषारी पदार्थ, प्रदूषक, कीटकनाशके, रसायने आणि बैठी जीवनशैली असू शकतात.
वंध्यत्व असलेल्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळी, वेदनादायक मासिक पाळी, गर्भपात, वजन वाढणे, लैंगिक इच्छा कमी होणे, चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि हार्मोनल चढउतार यासारख्या समस्या भेडसावू शकतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, अंडकोष, प्रोस्टेट किंवा लैंगिक अवयवांच्या समस्या, अंडकोषाला सूज येणे किंवा लहान अंडकोष, स्खलन समस्या, नैराश्य, वजन वाढणे आणि थकवा अशा समस्या जाणवतात.
गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी पर्यायी प्रजनन उपचारांची निवड करणे हा एक आशादायक पर्याय आहे. वंध्यत्वासाठी इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) उपचार स्त्रिया आणि जोडप्यांना मदत करू शकतात ज्यांनी नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हे कुटुंब सुरू करण्याच्या आशेने वृद्ध जोडप्यांना इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) आणि एग फ्रीजींगसारख्या इतर प्रक्रियेसह उच्च यश दर मिळवून देते. एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आणि आपल्यासाठी योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे. डॉक्टर तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची तपासणी करतील आणि त्यानुसार योग्य निर्णय घेतील. गर्भधारणेच्या यशस्वी परिणामासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायला विसरु नका.